लोकसत्ता टीम
नागपूर : गणेशोत्सवापासून ते विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत पोलीस विभागाचा सतत बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या तीन महिनांचा कालावधी पोलिसांच्या बंदोबस्ताच्या परीक्षेचा आहे.
राज्यभरात गणपती आगमनापासून पोलीस बंदोबस्ताला सुरुवात होते. जवळपास १२ दिवस गणपती बंदोबस्तात पोलीस डोळ्यात तेल ओतून सुरक्षा व्यवस्था सांभाळत असतात. गणेशोत्सव संपल्यानंतर लगेच ईद असून त्यासाठी पुन्हा बंदोबस्त लागणार आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून १५ दिवस नवरात्राचा बंदोबस्त असेल. त्यानंतर धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या बंदोबस्तासाठी पोलीस सज्ज असणार आहे. त्यासाठी दीक्षाभूमीवर देशभरातून आलेल्या बौद्ध बांधवांची मोठी गर्दी असते. कायदा व सुव्यवस्थेसाठी चक्क ‘मिनी पोलीस कंट्रोल रुम’ तयार करण्यात येते. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीसाठी बंदोबस्त लागतो. डिसेंबर महिन्यात विधिमंडळ हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते आमदार नागपुरात येतात.मोर्चे निघतात. त्यासाठी पोलीस तैनात केले जातात. डिसेंबरच्या अखेरीस ‘थर्टी फस्ट’ला सरत्या वर्षाला निरोप देणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शहरभर बंदोबस्त लावलाजातो. एकूणच येणाऱ्या तीन महिन्यांचा कालावधी हा पोलिसांच्या बंदोबस्ताची परीक्षा घेणारा आहे.
आणखी वाचा-नागपूर : ट्रकची दुचाकीला भीषण धडक; १४ महिन्यांच्या बाळाचा चिरडून मृत्यू, आई व मावशी जखमी
रजा, साप्ताहिक सुट्या बंद
‘माझ्या पप्पांनी गणपती आणलाय…पण पप्पा तर बंदोबस्तात आहेत’, अशी म्हणायची वेळ पोलिसांच्या मुलांवर आली आहे. सण-उत्सवाच्या बंदोबस्तात पोलीस कर्मचाऱ्यांना साप्ताहिक रजा किंवा कोणत्याही प्रकारची सुटी घेता येत नाही. सतत बंदोबस्तात असल्याचा परिणाम आरोग्यावर होतो. वडील किंवा आई पोलीस दलात असेल तर त्यांच्या कार्य व्यस्ततेमुळे मुलांना सण साजरा करता येत नाही. त्यामुळे मुलांच्याही आनंदावर विरजण पडते.
कुटुंब-नातेवाईकांचा हिरमोड
सलग बंदोबस्तामुळे पोलिसांचे कुटुंबीयसुद्धा त्रस्त होतात. घरातील अनेक महत्त्वाची कामे लांबणीवर पडतात. या दरम्यान घरातील किंवा नातेवाइकांकडील सणासुदीला कुटुंबीयांसोबत जाणे शक्य होत नाही. परिणामतः बंदोबस्तामुळे घरात ताणतणाव-वादविवाद वाढतात. तसेच वेळ न दिल्यामुळे नातेवाईकही नाराज होतात.