नागपूर : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास लाखोंमध्ये लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणारी टोळी सक्रीय झाली आहे. या सायबर गुन्हेगारांच्या टोळीने नुकताच एका वृद्धाची तब्बल २२ लाख ८६ हजार रुपयांनी फसवणूक केली. वृद्धाच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
हेही वाचा >>> बागेत सर्व प्रकारच्या फळे पण, खाणारे असतील फक्त पक्षी; असा असेल नागपूरचा बर्ड पार्क
तक्रारदार हे अजनी भागात राहतात. त्यांना अनोळखी व्यक्तीने ‘एफवाय ३३७’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर सहभागी केले. त्यानंतर मॅसेज पाठवून ‘एफवाय गोल्ड’ नावाचा ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. या ॲपवर ट्रेडिंग केल्यास जास्त नफा मिळेल, अशी थाप मारली. तक्रारदाराचा विश्वास बसला. त्यांनी ॲपवर ट्रेडिंग करण्यास सुरवात केली. सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळ्या बँकेतून त्यांना पैसे भरण्यास सांगितले. आपल्याला अधिक नफा मिळेल, या आशेवर त्यांनी पैसे भरायला सुरवात केली. पैसे भरण्याची रक्कम हळूहळू वाढत जाऊन ती २२ लाख ८६ हजार रुपयापर्यंत गेली. हा सर्व व्यवहार २० डिसेंबर २०२३ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान झाला. दीड महिन्याचा कालावधी लोटूनसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारला नफा मिळाला नाही. संशय बळावल्याने त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्याच्याशी संपर्क झाला नाही. आरोपींनी आपली ऑनलाइन फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा नोंदवून सायबर गुन्हेगाराचा शोध सुरू केला आहे.