बुलढाणा : बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटात काल रात्री उशिरा एका महिलेवर आठ नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. महिलेसोबत असलेल्या व्यक्तीकडे असलेली रक्कम हिसकावून घेत त्यांनी चाकूच्या धाकावर हे घृणास्पद कृत्य केले. दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात तळ ठोकला.
पीडित महिलेसोबत असलेल्या इसमाने याबाबत बोराखेडी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पीडित महिलेसह आणखी दोनजण गुरुवारी ( दि १३) संध्याकाळी राजुर घाटात देवीच्या मंदिराच्या परिसरात थांबले. यावेळी आठजणांनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादी जवळचे ४५ हजार लुटले. त्यानंतर पीडितेवर अत्याचार केला. आठजणांपैकी दोघांनी फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून ठेवला होता. नंतर पीडितेला दरीत नेऊन जबरदस्तीने आठजणांनी आळीपाळीने अत्याचार केला. आरोपींपैकी एक घटनास्थळाच्या जवळच असलेल्या मोहेगावचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. इतर सात आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. त्या पीडित महिलेसोबत असलेल्या नातेवाईकांना मारहाणही करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा – उपराजधानीत पाणीपुरी विक्रेत्यांची झाडाझडती! ‘एफडीए’ने काय कारवाई केली पहा
आमदार संतापले
पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केला असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तळ ठोकला. तब्बल तीन तास आमदार गायकवाड यांनी ठिय्या देत पोलीस अधीक्षकांशी संपर्क केला. अज्ञात आरोपींविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी आमदारांनी केली. त्यामुळे कारवाईला गती मिळाली. बोराखेडीचे पोलीस निरीक्षक माधव गरुड, उपनिरीक्षक अनिल भुसारी पुढील तपास करीत आहे.