शहरातील गरीब, गरजू मुलींना पैशांचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात फासल्यानंतर त्यांची लग्नासाठी परप्रांतात विक्री करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात गाडगेनगर पोलिसांना मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी यश मिळाले. या प्रकरणात ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार महिलेसह तिचे अन्य साथीदार फरार असून, त्यांचा कसून शोध घेतल्या जात आहे.
संतोष रामधन इंगळे (३४), मुकेश ज्ञानदेव राठोड (४०) व चंदा मुकेश राठोड (३८) सर्व रा. अकोला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नवसारी परिसरातील आकाश नामक तरुण हरवल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी २९ जानेवारी रोजी गाडगेनगर ठाण्यात दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास आरंभला. आकाशसह एक अल्पवयीन मुलगीही इंदोरला गेल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांचे एक पथक इंदोरला गेले. येथे तपासात सदर प्रकरण मानवी तस्करीचे असून त्यात एक टोळी सक्रिय असल्याचे समोर आले. दरम्यान, आकाशसोबत गेलेली मुलगी घरी परतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या मुलीला ठाण्यात बोलावून तिची चौकशी केली. यावेळी तिने आपबिती कथन केली. आरोपींनी आपल्याला पैशांचे आमिष दाखवून राजस्थानला विकले. तत्पूर्वी, त्यांनी मध्यप्रदेशातील रतलाम येथे आपले लग्न लावून दिले. त्यानंतर सर्व आरोपी आपल्याला सोडून तेथून निघून गेले. त्यानंतर आपण एक रात्रीच्या वेळी तेथून पळ काढत घर गाठले, असे तिने पोलिसांना सांगितले.
हेही वाचा – शाळांमध्ये विद्यार्थी दोन, शिक्षक तीन!
पीडित मुलीच्या बयाणाच्या आधारावर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. त्यानुसार या टोळीतील संतोष इंगळे, मुकेश राठोड व चंदा राठोड यांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार महिलेसह अन्य आरोपी फरार असून, त्यांचा कसून शोध सुरू आहे. दरम्यान, आकाशच्या शोधात एक पथक पुन्हा इंदोरला रवाना झाले आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. सदरची कारवाई ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक महेशकुमार इंगोले, इशय खांडे, नीळकंठ गवई, गजानन बरडे, आस्तिक देशमुख, सचिन बोरकर, समीर यांनी केली.