वर्धा : गुप्तधन, जादू्टोना, मंत्रशक्ती अश्या अंधश्रद्धांचा फास कायदा होऊनही श्रद्धाळू लोकांभोवती अद्याप आवळत चालला असल्याच्या घडामोडी आहेत. त्यात जीव जातो तो मुक्या निष्पाप प्राण्यांचा.काही दिवसापूर्वी मांडूळ सापांची तस्करी करणारे ताब्यात आले. ते अद्याप कोठडीत असतांना आता खवले मांजर या प्राण्याची तस्करी करणारी टोळी पकडल्या गेली आहे. तंत्र मंत्राच्या बाजारात कोट्यावधी रुपयाची उलाढाल या मांजरासाठी होत असल्याचे सांगण्यात येते.वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई व त्यांची अमरावती शाखा तसेच वर्धा वन विभागाने ही संयुक्त कारवाई केली आहे.
पुलगाव वन क्षेत्रात ही कारवाई झाली असून एक जिवंत खवले मांजर व सहा आरोपीना कारसह ताब्यात घेण्यात आले. अमरावतीचा नफिर उर रहमान, देवळी तालुक्यातील आगारगावचा पक्षराज फेतराज पवार, पुलगाव येथील मोहम्मद अनिस व गुरुबचनसिंग सागरसिंग बावरी, आगारगावचा संकेत पंकज चव्हाण व साईनगर अमरावतीचा अहमदखान अशरफखान अशी आरोपीची नावे आहेत. उपवनरक्षक हरवीर सिंग, सहायक वनसंरक्षक अमरजीत पवार यांच्या मार्गदर्शनात वनक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर तसेच जी एस. कावळे, यू. व्ही. शिरपूरकर, जी. जी. जाधव, एम. एस. माने,गिरीश गायकवाड यांच्या चमुने ही कारवाई केली.
अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदेश पदाधिकारी पंकज वंजारे हे म्हणतात की या कामात मांत्रिक व प्राणी पुरविणारे अश्या दोन टोळ्या असतात. मंत्र पुटपुटत पूजा करीत खवले मांजर सोडल्या जाते. हे मांजर भक्ष्य किंवा अन्य लहान प्राण्याचा वास घेते. अंदाज येताच जमीन उखरते. हा गुप्त धनाचा संकेत सांगत कथित मांत्रिक मग त्या जागेवर खोदकाम करते. हंडा सापडतो. असे खोटे व्हिडिओ तयार करीत लोकांची फसवणूक केल्या जाते. कुठलाच प्राणी किंवा पक्षी असे शोध घेत नसूनही त्यांना जीवाची किंमत मात्र मोजावी लागते. म्हणून प्राणी विक्री करणाऱ्या टोळीकडून कसून तपास करीत तस्करी शोधून काढली पाहिजे. हा कलंक दूर करावा. लोकांनी आता समजून घेतले पाहिजे असे आवाहन वंजारे यांनी केले आहे.