अकोला : महाराष्ट्रातील विविध शहरातून ट्रक चोरुन त्याची उत्तर प्रदेश, बिहारमध्ये विल्हेवाट लावणारी टोळी सक्रिय आहे. अकोल्यातून ट्रक चोरून उत्तर प्रदेश गाठलेल्या आरोपीला सिनेस्टाईल पकडण्यात आले. आरोपीने चोरलेला ट्रक उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेण्यात आला आहे.प्रभजीतसिंह साहनी यांनी रामदास पेठ पोलीस ठाण्यात त्यांचा ट्रक (क्र.एमएच ३० एव्ही ०६४६) रेल्वे मालधक्का येथून चोरी गेल्याची तक्रार २४ फेब्रुवारीला नोंदवली.
तपासामध्ये चोरलेल्या ट्रकमध्ये दहिहांडा फाट्यावर डिझेल टाकतांना आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. रामदास पेठ पोलीस ठाण्याचे शेख हसन शेख अब्दुला, श्याम मोहळे यांच्या पथकासह ट्रान्सपोर्टचे संचालक दिनेश चंदन यांनी आरोपीचा माग काढत ट्रकचा पाठलाग केला. परतवाड्यापासून पुढे ३० कि.मी. अंतरावर टोलवर सीसीटीव्हीमध्ये तो ट्रक आढळून आला. पुन्हा बैतूल आणि पुढे इटारसी मार्गावरील सीसीटीव्हीमध्ये आरोपी ट्रक घेऊन पसार होताना दिसून आला. ट्रकमधील जीपीएस प्रणालीमुळे तो झांसी-कानपूर मार्गावर असल्याचा पत्ता लागला. अकोल्याचे पथक त्या दिशेने रवाना झाले.
दरम्यान, या घटनेची माहिती उत्तर प्रदेशमधील उन्नाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश यादव यांना देण्यात आली. त्यांनी उन्नावचे उपनिरीक्षक ज्ञान सिंह, हेडकॉन्स्टेबल सत्येंद्र कुमार, कॉन्स्टेबल रवी कुमार, गौरव कुमार यांच्या पथकाला ट्रकचा पाठलाग करण्याच्या सूचना दिल्या. उन्नाव पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला. आरोपीने भरधाव वेगात ट्रक पळवला. पुढे मोरवा पोलिसांनी नाकाबंदी केली. तेथून देखील आरोपीने ट्रक पळवण्याचा प्रयत्न केला. मोरवा पोलीस आरोपीच्या मागावर लागले. पोलीस पाठलाग करीत असल्याचे पाहून आरोपीने अकोल्यातून चोरुन नेलेला ट्रक (क्र.एमएच ३० एव्ही ०६४६) रस्त्याच्या कडेला सोडून शेतामध्ये धाव घेतली. दरम्यान, ट्रक चोरणारा आरोपी नरसिंह रामस्वरूपसिंह गुजर (४१, रा. इंदोर, मध्य प्रदेश) याने रेल्वेने अकोला गाठले असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरी गेलेला ट्रक देखील परत आणण्यात आला. या प्रकरणात रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बिहारमध्ये विल्हेवाट लावण्याचे नियोजन फसले
ट्रक चोरणारी आंतरराज्य टोळी सक्रिय आहे. रेल्वे मालधक्का येथून २४ फेब्रुवारीला चोरलेला ट्रक बिहार राज्यात नेऊन त्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन होते. उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहकार्यातून ट्रक चोरी प्रकरणाचा रामदासपेठ पोलिसांनी पर्दाफाश केला.