नागपूर : कुख्यात शेखू खान टोळी आणि हिरणवार टोळीमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु असून शहरात पुन्हा एकदा ‘गँगवॉर’ भडकले आहे. शेखू खान टोळीने पारंपारिक प्रतिद्वंद्वी पवन हिरणवार याचा जानेवारी महिन्यात गोळ्या घालून खून केला होता. त्यामुळे हिरणवार टोळीने शेखू टोळीचा सक्रीय सदस्य असलेल्या अभी भुसारीचा चुलत भाऊ अविनाश भुसारी याचा गोळ्या घालून खून केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या हत्याकांडात आकाश शेंद्रे (चामडिया वस्ती, काचीपुरा) आणि सिद्धू भारद्वाज या दोघांना अटक केली आहे. शक्ती, बंटी आणि बाबू फरार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी शेखू खानचा भाऊ सरोज खान याची हिरणवार टोळीने हत्या केली होती. त्याचाच बदला घेण्यासाठी शेखू आणि त्याच्या टोळीने २ जानेवारीला बाबुळखेडा परिसरात पवन हिरणवार आणि त्याचा चुलत भाऊ शैलेष ऊर्फ बंटी हिरणवार यांच्यावर रस्त्यावर घेरून गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात पवन हिरणवार ठार झाला होता. त्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी शेखू खानला अटक केली आहे. पवन हिरणवार हत्याकांडाचा बदला घेण्यासाठीच अविनाश भुसारी हत्याकांड घडल्याची माहिती आहे. अविनाश भुसारी याचा चुलत भाऊ अभी भुसारी हा शेखू टोळीचा सदस्य आहे. त्याने पवन हिरणवारवर गोळ्या झाडल्या होत्या. तो सध्या हत्याकांडाच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याला जामीन मिळवून देण्यासाठी अविनाश भुसारी हा प्रयत्न करीत असल्याची माहिती हिरणवार टोळीला मिळाली.

त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीनंतर शक्ती, बंटी, बाबू, आकाश शेंद्रे आणि सिद्धू भारद्वाज या कुख्यात आरोपींनी साशो कॅफेसमोर अविनाश भुसारी याचा गोळ्या घालून खून केला. या हत्याकांडामुळे हिरणवार टोळी आणि शेखू खान टोळी पुन्हा एकदा आमनेसामने आली. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकल्याचे संकेत आहेत. गुन्हे शाखेने आकाश शेंद्रे आणि सिद्धू भारद्वाज या दोघांना अटक केली तर उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरु आहे.

थोडक्यात वाचला धीरज

हिरणवार टोळीने बंटी, बाबू आणि शक्तीच्या ‘टार्गेट’वर अविनाश भुसारी आणि धीरज नावाचा त्याचा मित्र होता. दोघांचाही खून करण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र, धीरजने वेळेवर मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यामुळे तो बाहेर सापडला नाही. याच कारणामुळे धीरज थोडक्यात वाचल्याची चर्चा आहे.