वर्धा : अवैध दारूविक्रीने चर्चेत असलेला वर्धा जिल्हा आता थेट पिस्तूल सापडल्याने चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी दोन गटात हाणामारी झाल्याने यातील गुंडांवर पोलीस नजर ठेवून होते. इतवारा परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार रीतिक तोडसाम हा पुन्हा सूड घेण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण होती. त्याच्या साथीदारांसोबत तो परत इतवारा भागात येणार असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेची चमू त्याच्या मागावर होतीच.

सापळा लावला असताना तोडसाम  विसावा चौकातून येताना दिसताच त्याला पकडण्यात आले. अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे चंदेरी रंगाचे दोन गावठी पिस्तूल तसेच नऊ एमएमचे जिवंत काडतुस आढलून आले. भारतीय हत्यार कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही काळापासून फरार असणारा तोडसाम हा नव्याने टोळी जमवून मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होता.आता अटक झाल्याने इतवारा परिसराने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

Story img Loader