नागपूर : दुचाकी ‘हँडल-लॉक’ करुन पार्किंगमध्ये ठेवली की वाहनमालक बिनधास्तपणे आपले काम करायला निघून जातात. मात्र, ‘हँडल-लॉक’ असलेली दुचाकीसुद्धा अगदी सहजरित्या चोरी करणाऱ्या टोळ्या उपराजधानीत सक्रिय झाल्य आहेत. एका टोळीने अवघ्या सात महिन्यांत शहरातून एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ६२ दुचाकी चोरल्या.

आरोपी चोरीची वाहने भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे आणून विक्री करायचे. टोळीचे येथूनच रॅकेट चालत होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टोळीतील पाच सदस्यांना मुसक्या आवळत ६२ दुचाकींसह एकूण २० लाख ४५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आकाश किशोर खोब्रागडे (२५), आकाश संपतलाल परतेकी (२७), मयंक उर्फ क्रिश विनोद बारीक (१९), दीपक द्वारकाप्रसाद बिजांडे (२४) त्याचा भाऊ विजय उर्फ  गोलू द्वारकाप्रसाद बिजांडे (३४) अशी आरोपींची नावे असून ते सर्व तुमसर येथील रहिवासी आहेत.

यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीतील भीलगाव, ग्राम पंचायत गेट समोरून तसेच आॅटोमोटीव्ह मेट्रो स्थानकाच्या पार्किंगमधून दोन दुचाकी चोरी गेल्या होत्या. तपासात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकाने जवळपास २०० ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही तपासले. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी आकाश खोब्रागडे याला महाराजबाग परिसरातून ताब्यात घेतले.

सखोल विचारपूस केल्यानंतर त्याने टोळीतील आकाश परतेकी आणि मयंक बारीक यांच्यासोबत मिळून शहरातून अनेक वाहन चोरी करून तुमसर येथील दीपक बिजांडे आणि विजय बिजांडे या दोन भावांकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. तुमसर गाठत पोलिसांनी आकाश, मयंक, दीपक तसेच विजय याला ताब्यात घेतले. पोलिसांना येथे अनेक चोरीच्या दुचाकी सापडल्या. काही वाहनांची आरोपींनी विक्री केली होती. ही विक्रीची वाहने देखील पोलिसांनी जप्त जप्त केली. आरोपींनी एकूण ६२ वाहने चोरल्या असून यातील ३८ चोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले.

मास्टर कीने करायचे चोरी

आरोपी वाहन चोरीसाठी ‘मास्टर की’ वापरायचे. आरोपी आकाश खोब्रागडे याच्याकडे ‘मास्टर की’ सापडली. आरोपी गर्दीत ठेवलेले वाहनावर लक्ष्य करायचे. वाहन मालकावर नजर ठेवून वाहन चोरून तुमसरला पाठवायचे. येथे आरोपी दीपक आणि विजय हे वाहनांचे क्रमांक तसेच इंजीन व चेचीसमध्ये बदल करून लोकांना विक्री करीत होते.

प्रेयसीवर उडवले पैसे

वाहन चोरी करून मिळालेल्या पैशांचा उपयोग आरोपींनी ‘ऑनलाईन गेम’ व प्रेयसीवर उडवले. तसेच काही पैसे जुगार खेळण्याकरिता वापरल्याचे  पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. दोन तरुणींवर दोन आरोपींचे प्रेमसंबंध असून त्या तरुणींसाठी महागड्या भेटवस्तू विकत घेतल्याचे समोर आले आहे. पोलीस आरोपींची चौकशी करत असून यात आणखी काही नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Story img Loader