अमरावती : महिलांचा वापर करून, नवनवीन मार्गांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्या राज्यात कार्यरत असून अशा प्रकारची एक घटना अमरावतीत उघड झाली आहे. कारमधून गांजा तस्करी करणाऱ्या पाच तस्करांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. या कारवाईत ४०.३५ किलो गांजा, कार, मोबाइल व रोख असा एकूण १३ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तीन महिलांचासुद्धा समावेश आहे. ही कारवाई शुक्रवार, ४ एप्रिल रोजी दुपारी नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील वाळकी मार्गावर करण्यात आली.
सय्यद राशिद सय्यद जमशिद (३५), अरफाक दानिश शब्बीर पटेल (२३) दोघेही रा. इस्लामी चौक, जुनी वस्ती, बडनेरा, मयुरी विजय चापळकर (१९), पूनम उमेश अंभोरे (३०) व निकीता सुभाष गायकवाड (२१) तिघीही रा. वडरपुरा, अमरावती अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नांदगाव पेठ टोल नाक्याकडून वाळकी गावाकडे जाणाऱ्या मार्गाने काळ्या रंगाच्या कार क्रमांक एमएच ४८ ए ४९०० मधून दोन पुरुष व तीन महिला हे विक्रीसाठी गांजा तस्करी करीत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली.
या माहितीच्या आधारावर वाळकी मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी सदर कार थांबविण्यात आली. त्यावेळी कारमध्ये सय्यद राशिद, अरफाक दानिश, मयुरी, पूनम व निकीता असे पाच जण बसून होते. कारची झडती घेतल्यावर त्यात ४०.३५ किलो गांजा आढळून आला. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट एकने पाचही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ८ लाख ६ हजार ६०० रुपये किमतीचा गांजा, दोन मोबाइल, ५ लाख रुपये किमतीची कार व २३ हजार ५०० रुपये रोख असा एकूण १३ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध नांदगाव पेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलीस निरीक्षक महेशकुमार इंगोले, पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, दीपक सुंदरकर, बबलू येवतीकर, गजानन ढेवले, आस्तिक देशमुख, अजय मिश्रा, मनोज ठोसर, संदीप खंडारे, मंगेश शिंदे, संग्राम भोजने, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, सागर ठाकरे, चेतन शर्मा, अनिकेत वानखडे, माधुरी साबळे व वर्षा घोंगळे यांनी केली.