कोळसा घोटाळ्यात अनेकांचे हात काळे झाले असल्याचे आजवर उघडकीस आले आहे. ‘कोलगेट’ प्रकरणाने राजकीय पुढाऱ्यांची नावे चर्चेत असताना नागपुरातील गुंडगिरीही कोळशाभोवती फिरते. उत्तर नागपुरातील गुंडगिरीचे उगमस्थान कोळसा प्रकरणातून झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकेकाळी नागपुरात अनेक आखाडे होते. या आखाडय़ात अनेक पहिलवान दणकट शरीरयष्टी मिळविण्यासाठी कसरत करीत. आखाडय़ातील पहिलवानांना समाजात मान-सन्मान मिळायचा. या मान सन्मानातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पहिलवानांवर समाजातील नागरिकांच्या संरक्षणाची आणि त्यांच्यासाठी लढण्याची जबाबदारी यायची. कालांतराने पहिलवानांच्या टोळ्या तयार झाल्या आणि त्यांच्यातच द्वंद्व सुरू झाले. पहिलवान हे आपापला परिसर संरक्षित करायचे आणि त्या भागातील काळ्या धंद्यांवरही त्यांचे वर्चस्व असायचे. याच काळात उत्तर नागपूरमध्ये भुजंग पहिलवान होऊन गेला. त्याचा प्रचंड दरारा होता. परिसरातील कुठलाही वाद असो, न्याय-निवाडय़ासाठी भुजंगकडे लोकांची गर्दी व्हायची. भुजंग हा गुंड असला तरी सर्वसामान्यांची प्रकरणे तो सामाजिकदृष्टय़ा हाताळायचा. त्याच्या पूर्वसंमतीशिवाय बाहेरील पहिलवान उत्तर नागपुरात पाय ठेवत नव्हते. परिसरातील नागरिकांच्या संरक्षणाची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जबाबदारीही तो पेलायचा. एका दिवशी त्याचा घात झाला. लहानू भांगे याने काही साथीदारांसह त्याचा कमाल चौकात निर्घृण खून केला. त्यानंतर निंबा पहिलवान, भीमा पहिलवान, अर्जुन पहिलवान आणि पंची पहिलवान यांचा उदय झाला. पंची पहिलवानासोबत उत्तर नागपुरातील मनगटाच्या बळावरील गुंडगिरीचा अस्त होऊन शस्त्राच्या धाकावरील गुंडगिरीचा उदय झाला.

शस्त्राच्या धाकावर गुंडगिरी करण्याच्या काळात सर्वात चर्चिली गेलेली घटना म्हणजे इंदोरा झोपडपट्टी परिसरातील कुख्यात कालाराम याच्या घरी घडलेले तिहेरी हत्याकांड होय. त्या हत्याकांडात पोलिसांनी कालारामलाच अटक केली होती. या प्रकरणात प्रसिद्ध विधितज्ज्ञ कृष्णा मेनन यांनी उच्च न्यायालयापर्यंत त्याचा लढा लढला. दरम्यान, अ‍ॅड. कृष्णा मेनन हे केंद्रीय कायदा मंत्री झाले आणि कालाराम हा पॅरोलवर कारागृहाबाहेर पडला. कारागृहाबाहेर येताच त्याने आत्महत्या केली. त्यानंतर शंकर लाला, खलील रमेश, ठेका बादशहा यांची नावे चर्चेत आली. ठेका बादशहाचे संबंध मुंबईतील अंडरवर्ल्डशी होते. पाचपावली, भानखेडा आणि लष्करीबाग परिसरात त्याची प्रचंड दहशत होती. विरुद्ध टोळीच्या एका गुंडाने बादशहाला आव्हान देऊन आवळे बाबू चौकात त्याला ठार मारले. दरम्यान, नागेश वानखेडे याची वेगळी टोळी होती. त्यावेळी त्याने चार ते पाच गुंडांचा खात्मा करून परिसरातील गुन्हेगारीवर वर्चस्व निर्माण केले होते. त्याच्यानंतर शस्त्राच्या धाकावर दहशत निर्माण करण्यात अनिल पाटील याला यश आले. त्याचा परिसरात प्रचंड दरारा होता. त्याच्या भीतीने लोक जरीपटका परिसरातील रस्त्यांनी जाणे टाळायचे, त्याच्या सुरस कथा आजही ऐकायला मिळतात. शहरातील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल होते. एक दिवस कमाल चौकातील एका सावजी हॉटेलमध्ये ५० ते ६० जणांनी मिळून त्याचा खून केला. जवळपास पाच वष्रे उत्तर नागपुरात त्याचा एकछत्री अंमल होता.

मध्यंतरी प्रसिद्ध उद्योजक एन. कुमार यांची सुपारी घेऊन गोळीबार केल्याप्रकरणी बबलू फ्रान्सिस याचे नाव चर्चेत आले होते. दरम्यान, वर्धा मार्गावर बबलूचा संशयास्पद मृत्यू झाला. हल्ली लिटील सरदार, जेन्टील सरदार आणि डल्लू सरदार या टोळ्यांचे उत्तर नागपुरातील गुन्हेगिरीवर वर्चस्व आहे. या टोळ्यांचे कोळसा तस्करी, भूखंड बळकावणे, वादग्रस्त भूखंड रिकामे करून कमिशन घेणे, अपहरण, खंडणी हे प्रमुख अवैध धंदे आहेत. या टोळ्या समोरासमोर आल्यानंतर एकमेकांवर गोळीबार करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. डल्लू सरदारने जवळपास दहा ते तेरा साथीदारांसह सूरज यादवच्या घरात घुसून त्याचा निर्घृण खून केला. त्या प्रकरणात डल्लू सरदार कारागृहात आहे.

नागपुरातील गुंडगिरी

पहिली मोक्काची कारवाई ‘लिटील’च्या नंबरकारीवर

नागपूर शहर पोलिसांनी मोक्का अंतर्गत पहिली कारवाई लिटील सरदारचा नंबरकारी शेख अय्युब ऊर्फ शेरू याच्याविरुद्ध केली होती. शेरू हा लिटील सरदारचा खास नंबरकारी होता. आता त्याने गुन्हेगारी क्षेत्राला रामराम केला असून, कामगार नगर परिसरात स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. कोळशाचे ट्रक लुटणे, अपहरण करून खंडणी मागणे आदी लिटीलचे प्रमुख अवैध धंदे असून, संतोष आंबेकरचा तो खास मित्र आहे.

राजकीय पाठबळ नाही

सध्या उत्तर नागपुरात तीन सरदारांच्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यांनी मनगटाच्या बळावर आणि काही अशिक्षित युवकांना हाताशी धरून आपली दहशत निर्माण केली आहे. आजही या टोळ्या एकेकटय़ाच काम करतात. त्यांच्या डोक्यावर कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचा आशीर्वाद नाही, हे विशेष.

(समाप्त)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangster active to capture coal mine in nagpur