अजय राऊत प्रकरणात राजू भद्रे टोळीची घुसखोरी
उपराजधानीत सट्टा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात फोफावला असून आंतरराष्ट्रीय बुकी नागपुरात आहेत. या व्यवसायात मोठय़ा प्रमाणात पैसा असून त्यावर आता उपराजधानीतील ‘डॉन’ संतोष आंबेकरचा डोळा आहे. परंतु शहरातील सर्वाधिक बुकी कुख्यात राजू भद्रे टोळीशी जुळलेले असून अजय राऊत प्रकरणाच्या माध्यमातून डॉन राजू भद्रे टोळीचा गेम करण्याच्या प्रयत्नात आहे.
गेल्या ११ डिसेंबरला सुमित बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स कंपनीचा मालक आणि क्रिकेट बुकी अजय श्यामराव राऊत याचे अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी त्याला पावनेदोन कोटीची खंडणी मागण्यात आली. या अपहरणामागे दिवाकर कुत्तरमारे असल्याची माहिती पोलिसांना आहे. परंतु तो फरार आहे. दिवाकर हा राजू भद्रे याचा खास नंबरकारी आहे. अजय राऊतचे अपहरण आणि खंडणीमागे राजू भद्रे असल्याची चर्चा गुन्हे वर्तुळात आहे. पोलिसांनाही तीच शक्यता वाटत आहे. दिवाकर सापडल्यानंतर सर्व कडय़ा जुळतील, अशी शक्यता पोलिसांमार्फत व्यक्त करण्यात येत होती. परंतु पोलिसांच्या पदरी निराशाच पडत आहे.
या सर्व घटनाक्रमात संतोष आंबेकर आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहे. आज शहरातील ८० टक्के बुकी राजू भद्रे टोळीशी जुळलेले आहेत. सट्टा लावणाऱ्या व्यक्तींकडून पैशाची वसुली करून देण्याच्या कामात बराच पैसा आहे. त्यामुळे भद्रे टोळीकडे सट्टा आणि हवालाचा पैसा येतो. भद्रे टोळीच्या तुलनेत आंबेकर टोळीशी हातावर मोजण्याइतके बुकी जुळलेले आहेत. त्यामुळे अजय राऊतच्या माध्यमातून चालून आलेली संधी आंबेकर गमवण्याच्या मनस्थितीत अजिबात नाही. पिंटू शिर्के प्रकरणात राजू भद्रे, विजय मते, मारोती नव्वा, दिनेश गायकी यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. भद्रे, मारोती नव्वा आणि गायकी हे कारागृहात असून मते हा फरार आहे. दिवाकर आणि कालू हाटे यांच्या मदतीने मते हा भद्रेचा व्यवसाय सांभाळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा