नागपूर : नागपुरात नवीन वर्षात टोळीयुद्धाने तोंड वर काढले असून भरदिवसा एकाची गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली. शेखू टोळी आणि हिरणवार टोळीमधील वैमनस्यातून ही घटना घडली. शेखू टोळीच्या सदस्यांनी कारने  जाणा-या  हिरणवार टोळीतील सदस्यांचा पाठलाग करून  खापरखेड्याजवळ  कारवर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात पवन हिरणवार यांच्या पाठीत गोळ्या लागल्याने  जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ बंटी हिरणवार आणि एक अन्य साथीदार गंभीर जखमी झाला. एखाद्या चित्रपटाला  शोभेल अशी घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजता घडली.गोळीबार केल्यानंतर शेखू टोळी लगेच पळून गेली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> संजय राऊत यांची ‘ती’ प्रतिज्ञा पूर्ण! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव असे का म्हणाले?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षापासून शेखू टोळी आणि पवन हिरणवार टोळीत वाद आहे. हिरणवार टोळीने शेखूच्या लहान भावाचा भरचौकात खून केला होता. त्यामुळे शेखूला हिरणवार बंधूचा ‘गेम’ करायचा होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते हिरणवार बंधू एकांतात केव्हा असतील, याची वाट बघत होते. पवन हिरणवार-बंटी हिरणवार हे दोघेही तीन साथिदारांसह गुरुवारी दुपारी बाभुळखेड्यातील पंचमुखी हनुमानाच्या दर्शनासाठी गेले होते. पवन आणि बंटी एकाच कारमध्ये असल्याची माहिती शेखूला मिळाली. शेखू हा आपल्या पाच साथीदारासह तीन दुचाकींनी पवनच्या मागावर निघाला. तर शेखू हल्ला करणार याबाबत अनभिज्ञ असलेला पवन हा देवदर्शन करुन कारने सुसाट परत येत होता.

हेही वाचा >>> भाजप आमदाराच्या जिवाला बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांकडून धोका, सुरक्षा पुरवण्‍याची मागणी

खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोनखैरी रस्त्यावर शेखूच्या टोळीने पवनच्या कारचा पाठलाग करणे सुरु केले. पवनची कार दिसताच शेखूच्या टोळीने पवनच्या कारवर अंधाधुंद गोळीबार करणे सुरु केले. दोन दुचाकीचालकांनी कारच्या मधोमध दुचाकी घालून पवन हिरणवारवर गोळ्या झाडल्या. यात  पाठीत गोळ्या लागल्याने पवनचा जागीच मृत्यू झाला तर  चालकाच्या शेजारी बसलेल्या बंटीवरही आरोपींनी गोळीबार केला. मात्र, त्यात बंटी थोडक्यात हुकला. गोळीबार होत असल्यामुळे चालकाने कार थांबवली. आरोपींनी चाकूनेही एका युवकावर हल्ला केला. तर कारमधील दोन युवकांनी शेखू टोळीवर प्रतिहल्ला केला. त्यामुळे शेखूने पळ काढला. झटापटीत शेखूच्या हातातील पिस्तूल घटनास्थळावर पडली. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जंगलात फिरत आहे.

टीप दिल्यानंतर केला हल्ला शहरातील गुन्हेगारांच्या काही टोळ्यावर राजकीय वरदहस्त आहे. शेखू आणि हिरणवार टोळीचेही राजकीय ‘कनेक्शन’ आहे. शेखूला हिरणवार टोळीतील एका सदस्याने पवन आणि बंटीची टीप दिली. त्यामुळेच शेखूने साथीदारासह हिरणवारच्या कारचा पाठलाग केला, अशी माहिती आहे. या घटनेमुळे शहरात पुन्हा टोळीयुद्ध पेटण्याची चिन्हे आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangwar in nagpur notorious gangster killed in firing adk 83 zws