नागपूर : प्रत्येक कार्यात पहिल्या पूजेचा मान श्री गणेशाचा असतो. तो सगळ्यांचा प्रमुख आहे. बुद्धीचा देवता, विघ्नहर, संकटमोचक असलेल्या बाप्पाला भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला पुजले जाते.
‘सुखकर्ता दुखहर्ता’ म्हणजे सुख आणणारा व दुःख दूर करणारा हे श्री गणपतीला उद्देशून रचलेले काव्य आहे. ही आरती पूजेच्या शेवटी म्हणण्यात आलेल्या आरत्यांपैकी पहिली असते म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. ही आरती नित्य पूजेतही म्हटली जाते, ‘जोगिया’ रागात ही आरती रचली आहे. विशेष म्हणजे देशी भाषेमध्ये या आरतीची रचना करण्यात आली आहे.
हेही वाचा – कॉंग्रेसची घराणेशाही अन् राष्ट्रवादी काँग्रेस सरदारांची फौज, बावनकुळे यांची टीका
सुख देणारा, दुःख हरण करणारा असा हा गजानन त्याची कृपा झाली की प्रेमाचा वर्षाव भक्तावर करतो. सर्वांगाला उटी शेंदूराची लावलेली आहे. त्याच्या कंठात मोतयांची माळ आहे. हे देवा तुझा जयजयकार असो. तुझ्या दर्शनाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
तुझ्या कपाळावर रत्नजडित मुकूट आहे. कुंकू केशर, मिश्रित चंदनाची उटी लावलेली आहे. हिरे जडीत मुकुट तुझ्या मस्तकावर शोभून दिसतो. तसेच पायात घुंगरांचे वाळे असल्यामुळे मधुर मंजुळध्वनी रुणझुणत आहे.
हेही वाचा – तब्बल १५० सरकारी पदांसाठी भरती, सुशिक्षित बेरोजगारांना सुवर्णसंधी
मोठे पोट आणि पीतांबर नेसलेला अशा तुझ्या कमरेला नागाचा करगोटा आहे. तिन नेत्र असलेला, सरळ सोंड वाकडे तोंड असा तुझा अवतार मनमोहक आहे. अशा देवा मी तुझा दास माझ्या घरी आतुरतेने वाट पाहत आहे. सर्वांकडून पुजला जाणारा तु मला प्रसन्न हो.
असा या आरतीचा संक्षिप्त अर्थ असून हे पद समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिले आहे. पुणे जिल्ह्यात असलेल्या मोरगावातील गणपतीची मूर्ती पाहून समर्थांना ही आरती लिहिण्याची प्रेरणा मिळाली, असे मानले जाते.