हे गणराया, लहरी पाऊस, दुष्काळ, नापिकी, बळीराजाच्या आत्महत्या या वेदना देणाऱ्या बातम्यांच्या पाश्र्वभूमीवर तुझे झालेले आगमन कडक ऊन्हात थंड वाऱ्याची झुळूक यावी तसे आहे. बुध्दीची देवता म्हणून सारेजण तुझ्याकडे अपेक्षेने बघतात. कुणावर विश्वास ठेवावा, असे प्रश्नांकीत वातावरण सर्वत्र असताना तुझ्यावरचा विश्वास अढळ असणारी मने आजही मोठय़ा संख्येत आहेत. त्यामुळे तुझ्याकडून अपेक्षाही तेवढय़ाच जास्त असतात. अशा विस्कळीत वातावरणात आता तूच सद्बुध्दी दे, असे साकडे घालणारे सध्या तुझ्या भक्तीरसात न्हाऊन निघाले आहेत. गेल्या वेळी तू आला तेव्हा राज्यात नवे सरकार यायचे होते. नंतर ते आले आणि विदर्भाला चक्क लॉटरीच लागली. उमदे व तरुण नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. केंद्रात नितीन गडकरी, राज्यात देवेंद्र, दोन्हीकडे सत्तेत असलेला पक्ष लहान राज्यांचा पुरस्कार करणारा, त्यामुळे आता विदर्भ राज्य होणारच, अशा चर्चा सर्वत्र झडू लागल्या. आधी विकास, मग राज्य, असे संकेत देत ‘२०१८’ हे साल निश्चित, अशा बातम्या या दोन्ही वजनदार नेत्यांच्या वर्तुळातून बाहेर पडू लागल्या. यामुळे हर्षवायू झालेल्या काही विदर्भवीरांनी केस काळे करणे सोडून दिले. तेवढय़ात कोल्हापूरच्या जावयासमोरची माशी दिल्लीत शिंकली आणि वजनदार नेते विदर्भाचा मुद्दा पार विसरून गेले. तेव्हा गणराया, आता या दोन्ही नेत्यांना स्वतंत्र विदर्भ करण्याची सुबुध्दी देण्याची जबाबदारी तुझी. या दोघांनी तुझ्यासमोर हात जोडले की, त्यांना तथास्तू म्हणण्याआधी ही आठवण करून दे, तरच हा मुद्दा मार्गी लागू शकेल.
नवे सरकार आले की, पहिले वर्ष घोषणाबाजीत जाते, हा अनुभव नवा नाही. सध्या तोच सर्वजण घेत आहेत. आता या नेत्यांना घोषणेच्या पुढे जाण्याची इच्छाशक्ती तुला द्यायची आहे. केवळ घोषणा करून पोट भरले असते, तर विदर्भ कायम तृप्ततेची ढेकर देत बसला असता. घोषणेपलीकडील वास्तवाची जाण या नेत्यांना या मंगलपर्वात करून देण्याचे काम तुलाच करायचे आहे. नवे सरकार आले तरी विदर्भातील शेतकऱ्यांचे दु:ख तसेच आहे. सत्तेत येण्यापूर्वी बळीराजाचे मन लुभावणाऱ्या घोषणा करणारे हे नेते आता खुर्ची मिळताच प्रशासकीय चौकटीच्या चाली खेळू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या सारीपाटावरील प्यादी जिथल्या तिथेच आहेत. नवे नेते या प्याद्यांना समोर चाल देतील, ही अपेक्षा फोल ठरू लागली आहे. मानसिकदृष्टय़ा खचलेल्या या बळीराजाला श्रध्दावान करण्यापेक्षा सशक्त करण्याची गरज आहे. गणराया, तुला या शेतकऱ्यांच्या मनाला उभारी द्यायचीच आहे, पण सोबतच आधीची आश्वासने विसरणाऱ्या या नेत्यांना जरा कडक शब्दात समज सुध्दा द्यायची आहे. जगाचा पोशिंदा अडचणीत असताना नुसते हवेत पूल बांधून काही उपयोग नाही, हे वास्तव या नेत्यांच्या कानात सांगायचे आहे. पावनपर्वात हे सुध्दा तू करशील, अशी आशा आहे.
गणराया, तुला कोणत्याही रूपात बघितले तरी तृप्ती तुझ्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतांना दिसते. नवे सरकार मात्र खाण्यापिण्यावर बंदी घालण्यात व्यस्त आहे. तुझा मोदक तेवढा त्यांनी वगळला आहे. खरे तर, प्रत्येकाच्या घरात डोकावण्याचा अधिकार तुझा. तू तो यांना दिला का? दिला असेल तर तो काढून घे व यांना जरा घरात डोकावू नका, असे बजावून सांग! कारण, ही सगळी मंडळी अतिशय श्रध्दावान आहे. त्यामुळे या नेत्यांना तुझीच मात्रा लागू पडते, इतरांची नाही. या मागण्या तुझ्याकडे कराव्या लागतात कारण नाईलाज आहे. सरकारला जाब विचारणारे विरोधक सध्या विदर्भात दिसत नाहीत. मध्यंतरी पराभूत झालेले काही नेते लंडनला जाऊन इतके थंड होऊन आले की, तेथे पांघरलेल्या शालीतून ते अजून बाहेर पडायलाच तयार नाहीत. सामान्य जनतेला प्रत्येक गोष्टीवर जाब विचारण्याची सोयच नाही. कारण, प्रत्येकाकडे ट्वीटरचे खाते नाही. हे नवे नेते केवळ याच खात्यातून व्यक्त होतात म्हणून सर्वाची पंचाईत झाली आहे. अशा अडचणीच्या वेळी तूच एकमेव आधार आहेस गणराया! तू कुठल्याही खात्यात नि:संकोच प्रवेश करू शकतो.
बाकी तसे ठीक चालले आहे गणेशा! सरकार बदलले तरी भ्रष्टाचार तसाच सुरू आहे. मागील पानाहून पुढे. या बदलामुळे हिंदुत्ववाद्यांना सध्या बरे दिवस आले आहेत. संघाचे सल्ला देणे वाढले आहे. मध्यंतरी मोहन भागवतांनी हिंदू धर्मातील अशास्त्रीय रुढी सोडा, असे म्हटले आणि शास्त्रीय काय व अशास्त्रीय काय, असा वाद सुरू झाला. गोळवळकर खरे की भागवत, अशी चर्चा सुरू झाली. तुझ्या सामान्य भक्तांना याच्याशी फारसे घेणे-देणे नाही. काय सोडायचे व काय ठेवायचे, हे त्याला बरोबर कळते. त्याच्यासमोरचे प्रश्न वेगळे आहेत व ते रोजच्या जगण्याशी निगडीत आहेत. तेथे त्यांना दिलासा हवा आहे व तोच लवकर मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे साऱ्यांचा व्यवस्थेवरचा राग वाढत चालला आहे. हे वातावरण निवळण्यासाठी व्यवस्थेने उत्तरदायित्वाची जबाबदारी नीटपणे निभावणे गरजेचे आहे. नेमके तेच होताना दिसत नाही गणराया. त्यामुळे तुला साकडे घालण्याची वेळ आली आहे. वर्षांतून फक्त दहा दिवसासाठी तू येतो. तुला तरी किती मागायचे, हाही प्रश्नच आहे. आमचे मागणे फार नाही गणराया, पण तुझे सद्बुध्दीचे मोदक या नेत्यांच्या ताटात जरा जास्त पडू दे. ते खाऊन तरी ही मंडळी जनतेप्रती अधिक प्रामाणिक होतील, अशी अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे?
– देवेंद्र गावंडे

Story img Loader