जिल्ह्यात गणेशोत्सव धडाक्यात सुरू आहे. दोन हजार ४६८ मंडळानी गणपतीची प्रतिष्ठापणा केली. दीड, अडीच दिवसांच्या घरगुती गणपतीस निरोप दिल्यानंतर आता सार्वजनिक मंडळांनी गणरायाच्या निरोपाची तयारी सुरू केली आहे.
जिल्ह्यात दहाव्या व अकराव्या दिवशी सर्वाधिक गणपतीचे विसर्जन केले जाणार असून, प्रशासनाने निरोपाचे वेळापत्रक ठरवून दिले आहे. गणेश चतुर्थीला गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले. जिल्ह्यात मंडळाकडून आकर्षक देखावे साकारण्यात आले. गणेशोत्सवात नवचैतन्य निर्माण झाले असून, आबालवृद्धांसह लहान मुलेही बाप्पांच्या भक्तीत तल्लीन झाले आहे. यवतमाळ उपविभागात ३४९, दारव्हा उपविभाग ६९७, पुसद उपविभाग ४३४, उमरखेड उपविभाग ४८५, वणी उपविभाग २४५, पांढरकवडा उपविभाग २६६ याप्रमाणे सहाही उपविभागात एकूण दोन हजार ३६८ मंडळांची संख्या आहे. शहरी भागात ५४८ तर ग्रामीण भागात सर्वाधिक एक हजार ४५१ मंडळात प्रतिष्ठापना करण्यात आली. ४६९ गावात ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्यात आला. हा उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिसांचा जिल्हाभरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस अधिकारी गणेशोत्सव मंडळात जाऊन पदाधिकार्यांच्या भेटी घेत आहेत.
हेही वाचा >>> सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची अडचण होणार; पश्चिम व दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना…
सार्वजनिक गणेशोत्सव मंंडळांकडून सामाजिक जाणीवेतून अनेक प्रकारचे उपक्रमदेखील राबविण्यात येत आहे. विसर्जनादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शनिवारी ३४ मंडळांच्या तर रविवारी पाच मंडळांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. आज, सोमवारी ३४, मंगळवारी १२, बुधवार ३५०, गुरुवारी ९२४, शुक्रवारी ९८१, तर शनिवारी ९८ मंडळांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. तसे वेळापत्रकच सर्व मंडळांना देण्यात आले आहे.
हेही वाचा >>> अकोला : खाद्यपदार्थांचा दर्जा राखण्यासाठी रेल्वे प्रशासन ‘अलर्ट मोड’वर, उपहारगृहांची कसून तपासणी; भुसावळ विभागात विशेष मोहीम
‘एक गाव एक गणपती’ उपक्रमातून सामाजिक सलोखा जिल्ह्यातील ४६९ गावात ‘एक गाव एक गणपती’ बसवून सामाजिक सलोख्यासह एकतेचा संदेश देण्यात आला. यवतमाळ उपविभागात ९३, दारव्हा उपविभाग १३३, पुसद उपविभाग ७१, उमरखेड उपविभाग ८८, वणी उपविभाग ४०, पांढरकवडा उपविभागात ४४ याप्रमाणे गावांत एक गणपती बसविण्यात आला आहे.