नागपूर : ‘जी २०’ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी शहर सुशोभित केले जात आहे. रस्त्यांच्या दुतर्फा आकर्षक फुलझाडे, विद्युत रोषणाई आणि रंगरंगोटी करण्यात आली आहे. मात्र, या झगमगाटात विदेशी पाहुण्यांना जो भाग दिसू नये असे काही ठिकाण तिरंगा ध्वज असलेल्या कापडाने झाकून ठेवत लपवाछपवी केली असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

‘जी २०’ शिखर परिषदेच्या निमित्ताने शहराच्या सौंदर्यीकरणाची जबाबदारी महापालिकडे देण्यात आली असून गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांतील भिंती आकर्षक चित्रांनी रंगवल्या जात आहेत. ज्या मार्गाने विदेशी पाहुणे जाणार आहेत त्या मार्गावर आकर्षक रोषणाईसह फुलझाडे लावण्यात आली असताना जो भाग मोकळा आहे किंवा तिथे कचरा आहे अशा ठिकाणी कापड लावत तो भाग झाकून ठेवण्यात आला आहे. विधानभवनासमोर असलेल्या ‘बाटा शो रूम’वरील इमारतीचा खराब झालेला दर्शनी भाग दिसू नये यासाठी तिरंगा ध्वज असलेले कापड त्याला लावण्यात आले आहे. याशिवाय वर्धा मार्गावर राजीवनगर परिसरात फुटपाथला लागून अस्वच्छ परिसर आहे. हॉटेल सेंटर पॉईंट ते विवेकानंद नगर या मार्गावर रस्त्याची कामे सुरू असताना तो भाग कपड्याने झाकलेला आहे.

हेही वाचा – नागपूरमध्ये आजपासून ‘सी-२०’ परिषद, ‘जी-२०’अंतर्गत कार्यगट बैठकीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जयप्रकाश नगर येथील मेट्रो स्टेशनपासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला कचरा आणि झाडेझुडपे आहेत. मात्र हा परिसर पांढरा कापड आणि तिरंगा ध्वज असलेल्या कापडांनी झाकून ठेवण्यात आला आहे. सिव्हिल लाईन भागात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत, त्यामुळे या भागात वेगवेगळ्या रंगाचे कापड लावत परिसर कापडांनी सुशोभित करण्यात आला आहे. अजनी चौकात रस्त्याच्या कडेला मलवाहिनी व फुटपाथच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मात्र, त्या ठिकाणी लावण्यात आलेले तिरंगा ध्वज असलेले कापड गुंडाळून ठेवण्यात आले आहे. तर काही भाग फाटलेला असल्याचे दिसून आले.

हेही वाचा – विदर्भाला अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा; पिकांची अतोनात हानी, शेतकरी हवालदिल

वर्धा मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून छोटे विक्रेते आणि गोरगरीब लोक व्यवसाय करत असताना त्यांना हटवण्यात आले असून तो परिसर सुद्धा कापडांनी झाकून ठेवण्यात आला आहे. विदेशी पाहुण्यांना खूश करण्यासाठी आणि त्यांना नागपूर शहर चांगले दिसावे यासाठी रामदासपेठ, दीक्षाभूमी परिसर, रहाटे कॉलनी, उज्ज्वल नगरसह अन्य भागात सौंदर्यीकरणाच्या नावाखाली फलक, कापड लावून तो सुशोभित केला जात आहे.

Story img Loader