अधिकृत-अनधिकृत वस्त्यांचा वाद
भांडेवाडी कचराघर आधी की परिसरातील वस्त्या, असा वाद उपस्थितीत करून कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट न लावल्याने या भागातील वस्त्यांमधील एक पिढीच विविध रोगाने बाधित झाली. परिसरातील बीडगावमध्ये कंपोस्ट डेपोचे डम्पिंग यार्डमध्ये रूपांतर होण्यापूर्वीच अनेक नागरी वस्त्या होत्या. त्यावर अनधिकृत वस्त्यांच्या शिक्का असला तरी तेथे लोकं राहतात व त्यांचे जिणे असह्य़ होत आहे, याकडे कोणाचेच लक्ष नाही.
शहर विकास आराखडय़ात कंपोस्ट डेपो म्हणून भांडेवाडी येथे जागा आरक्षित होती. तेथे संपूर्ण शहराचा कचरा एकत्र केला जाऊ लागला. दरम्यान, भू-माफियांनी या भागात भूखंड पाडून त्याची विक्री केली. त्यामुळे तेथे नागरी वस्त्या तयार झाल्या. त्या अनधिकृत होत्या. काही झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या. दरम्यान, काळात अनधिकृत वस्त्यांना नियमित करण्यात आले. लोकवस्ती जशी वाढली तशीच कचराघराची व्याप्तीही वाढली. तेथून निघणाऱ्या विषारी वायूचा नागरिकांना त्रास होऊ लागला. सध्याच्या स्थितीत भांडेवाडीच्या प्रदूषणामुळे दुर्गानगर, श्रावणनगर, नागेश्वरनगर, अंबेनगर, शिवमनगर, अंतुजीनगर, चांदमारीनगर, संघर्षनगर, पवनशक्तीनगर, तवक्कल लेआऊट, सूरजनगर, शैलेशनगर, न्यू सूरजनगर, देवीनगर, शनि मंदिर वस्ती, धरती माँ नगर आणि बीडगाव येथील सुमारे २५ ते ३० हजार नागरिक यामुळे त्रस्त आहेत. बीडगावची अवस्था फारच वाईट आहे. शहर आणि कचरा घर यामध्ये हे गाव वसलेले आहे. रस्त्यांच्या दुतर्फा नुसता कचरा आहे. कचराघराच्या सीमेवरच साईबाबा नगर आहे. भांडेवाडी लगतच्या सूरजनगरातील नागरिक मालमत्ता कर देतात. महापालिकेने त्यांना नळ जोडण्या दिल्या. महावितरणने वीज दिली. रस्तेही तयार केले जात आहे.
साईबाबानगर, बीडगाव येथील जयश्री मेश्राम म्हणाल्या, पंधरा वर्षांपूर्वी प्लॉट घेतले. तेव्हा भागात कचरा टाकण्यात येत नव्हता. गेल्या चार ते पाच वर्षांपासून वस्ती शेजारी कचरा टाकला जातो. तेथून तो हवेमुळे घरात येतो. वर्षभर कुबट वास आणि धुळीचा त्रास होतो.
आम्ही १६ वर्षांपासून राहत आहोत. माझा मुलगा टीबीने आणि मुलगी श्वसनाच्या आजाराने मरण पावली. दोन नातवंडांचा सांभाळ करतो आहे. येथून कचराघर हटवण्यात यायला हवे, असे सूरजनगरातील मीराबाई कुंभरे म्हणाल्या.
शहर विकास आराखडा निश्चित करताना वेगवेगळ्या उपक्रमासाठी भूखंड आरक्षित केले जातात. मात्र, ते ताब्यात घेतले जात नाही. कालांतराने भू-माफिया मोकळ्या जागेवर भूखंड पाडून ते अनधिकृतपणे विकतात. स्वस्त मिळतात म्हणून घेणारेही पुढचा काही विचार न करता तेथे घरे बांधतात. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या नावाने ओरड सुरू होते. नागरिकांचा प्रश्न निर्माण झाल्यावर प्राथमिक सोयी तेथे उपलब्ध करून दिल्यावर अनधिकृत वस्त्या नियमित करण्याची मागणी होते हा आतापर्यंतचा शिरस्ता आहे. भांडेवाडी परिसरातील वस्त्या हा त्याचाच परिपाक होय. सर्वसामान्य नागरिकांना पडवडेल अशा दरात घरे उपलब्ध करून देण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
अधिकृततेचा हा घ्या पुरावा
सूरजनगर येथील प्रमिला हरीश नन्नावरे यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना घराच्या मालिकीचे पुरावे सादर केले. त्यांनी मालमत्ता कर भरल्याचा आणि नामांतरण केल्याचा पुरावाच सादर केला. या महिलेने १६/१२/२०१० मध्ये नामांतरणाची (म्युटेशन) प्रक्रिया केली. तसेच घर क्रमांक २१७९ ए २१बी आणि इंडेक्स क्रमांक २१०११६३५ एलबी०१ असलेल्या घराचे मालमत्ता कर ०९/०९/२०१६ ला भरणा केला आहे.