कचरा वेचक महिलांनी लघुउद्योगाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा एक नवाच धडा समाजापुढे ठेवला आहे. समाजात अत्यंत हीन व तुच्छतेचे काम करणाऱ्या म्हणून कचरा वेचक महिलांकडे बघण्याची दृष्टी आहे. मात्र त्यांना सन्मानपूर्वक काम व स्थान मिळावे म्हणून काही वर्षापासून स्वयंसेवी संस्था कार्य करीत आहे. १ मार्च १९९२ ला कोलबिंया येथे ११ कचरा वेचक महिलांची हत्या करण्यात आली होती. त्यांना श्रद्धांजली म्हणून १ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिन म्हणून साजरा केला जातो.
हेही वाचा- वर्धा : शेतात देहविक्रीचा व्यवसाय
शहरातील कचरा साचलेल्या भागात या महिला पहाटेपासून फिरतात. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांतून उपयुक्त वस्तू निवडून त्या भंगारात विकण्याचे काम सातत्याने चालते. अत्यंत गरीब व निरक्षर अशा या महिलांसाठी स्त्रीमुक्ती ही संघटना काम करीत आहे. गत काही वर्षात या संस्थेच्या माध्यमातून कचरा वेचक महिलांची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
हेही वाचा- नागपूरमधील गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात कोलदांडा कोणाचा?
वर्धेत आर्वीनाका वडर वस्ती व बोरगाव येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देणे सुरू आहे. जैविक खत, बागेची देखरेख, अगरबत्ती, मेणबत्ती व साबण तयार करण्याच्या कामात या महिला अग्रेसर आहे. एकूण अडीचशेवर महिलांची नोंद झाली आहे, तर सहा बचत गटाच्या माध्यमातून ८० महिला आर्थिक व्यवहार करत आहे. दाेन बचत गटांना इंदिरा उद्यान व संभाजी उद्यानाच्या देखभाल व दुरुस्तीचे काम मिळाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबात आशेची किरणं झळकत आहे.
या महिलांच्या कार्याशी परिचित असलेल्या प्रा. डॉ. माधुरी झाडे सांंगतात की, या महिलांनी कचऱ्यापासून घरीच खत तयार करण्याचे तसेच परसबाग जोपासण्याचे कौशल्य आम्हास शिकवले. त्यांच्यावर विश्वास टाकून घरची पण काही कामे त्यांच्यावर सोपवले. लोकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून या महिलांचे कचऱ्याच्या ढिगातील कार्य अमोल असे असल्याचे ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्ष करुणा फुटाणे म्हणतात. स्वयंसेवी संस्थेच्या डॉ. प्रीती जोशी या कार्यात महिलांना मार्गदर्शन करतात. कचरा व्यवस्थापन ही मोठी समस्या आहे. ती दूर करण्याचे कार्य करणाऱ्या कचरा वेचक महिलांना आत्मनिर्भर करण्याचे काम संस्था करीत आहे. अशा महिलांसाठी बचतगट चालवणाऱ्या व स्वत: कचरा वेचणाऱ्या कांता जाधव, रेणुका हराळे, पद्मीनी जाधव, कविता गायकवाड व कमला जाधव या पाच महिलांचा त्यांच्या कार्याबद्दल सन्मानही झाला आहे.
हेही वाचा- ‘भारतीय विज्ञान काँग्रेस’चा हिशोब नेमका कुणाकडे? नागपूर विद्यापीठ म्हणते, ३१ मार्चनंतर माहिती देऊ
कांता जाधव म्हणतात की, दोन बचतगटांना बँकेने एक लाख रुपयाचे कर्ज दिल्यानंतर त्याची आता परतफेड सुरू आहे. काही महिलांना व्यवसायासाठी व्यक्तिगत कर्ज देण्यात आले होते. संपूर्ण कर्ज त्यांनी व्याजासकट परत केल्याची बाब श्रीमती जाधव अभिमानाने नमूद करतात.