अकोला : जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर व्याळा गावाजवळ एक गॅस टँकर उलटल्याची दुर्घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे. गॅस टँकरचा अपघात झाल्यावर सुदैवाने त्यातून गॅस गळती झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा जयपूर येथील गॅस टँकरच्या भीषण अपघात प्रकरणाची पुनरावृत्ती अकोला जिल्ह्यात घडण्याची शक्यता नाकारता आली नसती. अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर अकोल्यावरून बाळापूरकडे इंडियन कंपनीचा गॅस टँकर (क्र. एमएच ०४ जेके १८७८) जात होता. दरम्यान, महामार्गावरील व्याळा गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्याच्या बाजूला उलटला. गॅस टँकरचा अपघात होताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले. महामार्गावरून धावणाऱ्या इतर वाहन चालकांनी दूरच आपली वाहने रोखून धरली होती. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. या अपघातात चालक आलोक विरेंद्र सिंह गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. नशीब बलवत्तर म्हणून अपघातग्रस्त टँकरला आग लागली नाही. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

हेही वाचा…नागपूर : पाच दिवसांपासून दररोज एक हत्याकांड! उपराधानीत कायदा व सुव्यवस्था…

जयपूर गॅस टँकर भीषण अपघाताची घटना ताजीच

दरम्यान, राजस्थानातील जयपूर-अजमेर महामार्गावर २० डिसेंबर रोजी सकाळी एलपीजी गॅसने भरलेल्या एका टँकरने अन्य टँकर व ट्रकला धडक देऊन भीषण अपघात घडला होता. त्या अपघातात टँकरचा मोठा स्फोट झाला. त्यामुळे आजूबाजूची अन्य वाहने देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. या भीषण अपघातात १५ पेक्षा अधिक नागरिकांचे प्राण गेले, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जयपूर येथील अपघाताची ही घटना ताजी असतांनाच अकोला जिल्ह्यात महामार्गावर गॅस टँकर उलटला. या अपघातामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. घटनास्थळावर अपघातग्रस्त टँकर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना अडचणीचा सामना करावा लागला. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्या अपघातात अनेकांचे जीव जात असून जखमी देखील होत आहेत. वाहतुकीचे नियम पाळत सावध राहून चालकांनी वाहन चालविण्याची गरज आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gas tanker overturned near vyala village on nh 53 in akola district on sunday ppd 88 sud 02