नागपूर : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतेच राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतचे परिपत्रक जाहीर केले. यात भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन जयंती २५ ऑगस्टला साजरी करण्याच्या सूचना दिल्या. यावर अखिल भारतीय महानुभाव महामंडळाने आक्षेप घेतला आहे. श्रीचक्रधर स्वामी हे परमेश्वर अवतार आहेत. राष्ट्रपुरुष किंवा थोर व्यक्ती नाहीत. त्यांना जीव श्रेणीत आणून महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महानुभाव धर्माचा अपमान केला आहे. त्यामुळे या यादीतून त्यांचे नाव तात्काळ काढून टाकावे, अशी मागणी महामंडळाने केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामान्य प्रशासन विभागाने २७ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींची जयंती शासकीय व निमशासकीय विभागात साजरी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यात मृत राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींप्रमाणेच २५ ऑगस्ट २०२५ ला सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन त्यांची जयंती त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करावी, असा आदेश आहे. अखिल भारतीय महानुभाव महामंडळाच्या प्रसिद्ध पत्रकानुसार, हा आदेश महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाला छेद देणारा आहे. महानुभावपंथीय श्रीचक्रधर स्वामींना परब्रह्म परमेश्वर मानतात. त्यांचे जीवोद्धरणाचे कार्य अविरत सुरू असून त्यांचा अवतार चिरायू आहे. राज्य शासनाने जयंती सदरामध्ये सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे नाव घेऊन त्यांचा मृत्यू सूचित केला, असाही आक्षेप घेण्यात आला असून शासनाने या यादीत २८ क्रमांकावर देण्यात आलेले सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे नाव तातडीने काढून टाकावे, अशी मागणी महामंडळाने केली आहे.

हेही वाचा…शरीर सौष्ठव स्पर्धेत ‘ यांनी ‘ मारली बाजी, पिळदार शरीराचे दमदार प्रदर्शन.

प्रतिमा पूजन निषिद्ध

महानुभाव तत्त्वज्ञान दैववादावर आधरित असल्याने जीव व परमेश्वर हे भिन्न मानण्यात येतात. त्यामुळे जिवांच्या जयंतीसोबत परमेश्वर अवतार असलेल्या श्रीचक्रधर भगवंतांच्या नावाचा अंतर्भाव करणे चुकीचे आहे. या तत्त्वज्ञानानुसार स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक या चार साधनांनाच वंदन, पूजन करणे ही महानुभाव पंथातील पूजाविधी आहे. कुठल्याही काल्पनिक प्रतिमा पूजनाला निषिद्ध मानले आहे. शासनाच्या परिपत्रकामध्ये सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याबाबतचा आदेश आहे. त्यामुळे या परिपत्रकातील सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे नाव तातडीने काढावे, अशी मागणी अखिल भारतीय महानुभाव महामंडळाच्या अध्यक्ष ॲड. तृप्ती बोरकुटे यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: General administration department issued a circular on national heroes anniversaries opposed by mahanubhava corporation dag 87 sud 02