यवतमाळ : शासनाने शाळा दत्तक योजना सुरू केल्यामुळे सर्वस्तरातून नाराजीचा सूर उमटत आहे. आर्णी येथील शेतकरी, कवी विजय ढाले यांनी शासनाच्या या निर्णयाला अभिवन आंदोलनांद्वारे विरोध सुरू केला आहे. प्रांरभी तहसीलदारांना निवेदन देवून त्यांनी या निर्णयासाठी सरकारविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. आता ढाले यांनी आपली किडनी विका आणि आर्णीत ते ज्या शाळेत शिकले ती शाळा आपल्याला दत्तक द्या, अशी मागणी केली आहे.
विजय शंकर ढाले हे आर्णीतील प्रसिद्ध कवी आहेत. शिवाय ते शेतकरी आहेत. शासनाने शाळा दत्तय योजना सुरू केली. या योजनेमुळे शाळा धनाढ्यांच्या हातात जावून ग्रामीण भागातील मुलांची शैक्षणिक प्रगती थांबण्याची भीती व्यक्त होत आहे. विजय ढाले यांनी जिल्ह्यात सर्वप्रथम या निर्णयास कडाडून विरोध सुरू केला. हा निर्णय जाहीर होताच त्यांनी आर्णी तहसीलदारांना निवेदन दिले आणि सरकारविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. या निवेदनाची प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने त्यांनी आर्णी व यवतमाळ येथे शाळांसाठी भीक्षा आंदोलन केले.
हेही वाचा >>> रेल्वे प्रवाशांसाठी आनंदवार्ता : ‘या’ १० गाड्यांना कायमस्वरूपी ३४ अतिरिक्त डबे; उद्यापासून…
सरकारकडे शाळा चालविण्यासाठी पैसा नसल्याने लोकसहभागातून निधी गोळा करून तो सरकारला पाठविण्यासाठी त्यांनी सायकलने रस्तोरस्ती फिरून भीक्षा गोळा केली व हा निधी महाराष्ट्र शासनाला पाठविला. त्याचाही शासनावर काही परिणाम झाला नाही. त्यामुळे आता विजय ढाले यांनी आपली किडनी विकायला काढली आहे. सरकारने आपली किडनी विकावी आणि ढाले हे आर्णी येथील ज्या आमची प्राथमिक नगर परिषद शाळा क्रमांक दोन येथे शिकले ती शाळा त्यांनाच दत्तक द्यावी, अशी मागणी त्यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. शाळा दत्तक योजनेंतर्गत आपण शिकलो ती शाळा दत्तक घेण्याची आपली इच्छा आहे.
हेही वाचा >>> संतापजनक! घरी खेळायला आलेल्या ५ वर्षाच्या चिमुकलीवर आते भावानेच केला अत्याचार
मात्र तेवढी रक्कम नसल्याने महाराष्ट्र शासनास आपण आपली किडनी देण्यास तयार आहो. ही किडनी विकून शासनाने शाळा दत्तक द्यावी. एका किडनीच्या रकमेत भागले नाही तर दुसरी किडनीही विकण्यास तयार असल्याचे लेखी पत्रच ढाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. गोरगरीब जनतेच्या शिक्षणाचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे विजय ढाले यांनी सांगितले. विजय ढाले यांच्या या आवाहनाला शासन काय प्रतिसाद देते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.