अमरावती : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील येथील अंबादेवी आणि एकवीरा देवीला अष्टमीच्या दिवशी ३ हजार १११ किलो सुक्या मेव्याचा नैवैद्य अर्पण करण्यात येणार आहे. अंबादेवी, एकवीरा देवी आरती मंडळाच्या वतीने दरवर्षी हा संकल्प पूर्ण केला जातो. सुक्या मेव्यात काजू, बदाम, खारिक, मनुका, अक्रोट, पिस्ता, अंजिर, चारोळी, गोडंबी, जर्दाळू यांचा समावेश असतो.
देवीला नैवैद्य अर्पण केल्यानंतर हा महाप्रसाद भाविकांमध्ये वितरीत केला जातो. अंबादेवी आरती मंडळाचे सदस्य सुमारे वीस वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवत आहेत. भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रसाद संकलनाला दरवर्षी लाभतो. ९११ रुपयांच्या प्रसाद वितरणापासून मंडळाने या उपक्रमाला सुरुवात केली होती. काही वर्षांतच भाविकांचा त्याला भक्कम प्रतिसाद लाभला.
हेही वाचा >>> ‘नशामुक्त पहाट’साठी साडेतीन हजार विद्यार्थ्यांकडून जनजागृती
दरवर्षी अष्टमीच्या रात्री भाविकांकडून संकलित सुका मेव्याचा प्रसाद बनवायला सुरुवात होते. अंबादेवी आरती मंडळाला प्राचीन परंपरा आहे. दरवर्षी नवरात्रात रात्री अकरा ते एक या वेळेत मंडळाचे सदस्य अंबादेवीची आरती करतात. शंभर वर्षांहून अधिक जुनी ही परंपरा असून देवींच्या तीनशे आरतींचा संग्रह मंडळाकडे आहे, असे आरती मंडळातर्फे सांगण्यात आले.