वर्धा : वाहतुकीची कोंडी होत असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक असलेल्या बजाज चौकात उड्डाण पूल आवश्यक ठरला होता.तत्कालीन खासदार दत्ता मेघे यांनी तशी भूमिका मांडत मंजुरी मिळविली. मात्र काम पुढे सरकेना. मगा खासदार रामदास तडस हे दहा वर्ष यासाठी प्रयत्नशील राहले. पण तरीही काम मार्गी लागले नाही. प्रश्न गर्डर लॉंचिंगचा राहला.
गर्डर म्हणजे पुलाच्या दोन बाजू जोडणारा लोखंडी ढाचा. तो जोडायचा तर मेगाब्लॉक घोषित करावा लागतो. तसे चार दिवसापूर्वी करण्याचे ठरले होते. मात्र पाऊस झाल्याने लांबले. मंगळवारी रात्री बारा वाजता ब्लॉक करीत गर्डर लॉन्च करण्याचे रेल्वे व स्थानिक बांधकाम विभागाने ठरविले. हीच संधी खासदार अमर काळे यांनी साधली. हे काम होणार असल्याची माहिती मिळाली आणि वेळेवर पोहचण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
हेही वाचा >>>खून, जाळपोळ अन् चकमकींसह स्फोटातही सहभाग; दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक
मोर्शी दौरा आटोपून ते रात्री एक वाजता उड्डाणपुलावर पोहचले. सोबत समर्थक मंडळी तसेच परिसरातील लोकं होते. गर्डरची पूजा करीत नारळ फोडले. आणि लगेच काम सूरू झाले. रेल्वे सेवा ही केंद्राच्या अखत्यारीत. म्हणून खासदार उपस्थित झाले आणि उड्डाणपुलाच्या पुढील कामाचा मार्ग मोकळा झाला. यासाठी पहाटे दोन ते चार पर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला होता.
केवळ एक दादर एक्सप्रेस अडकून पडल्याचे उपस्थितांनी सांगितले. या काळात गर्डर बसविण्यासाठी कंत्राटदाराची माणसे रेल रुळावार उभी होती. अत्यंत जोखमीचे असे हे काम समजल्या जाते. गर्डर बसल्याने आता त्यावर सिमेंटचा रस्ता करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र महत्वाचे काम काँग्रेस आघाडीच्या खासदाराच्या उपस्थितीत पार पडल्याने भाजप नेते पुढील कार्यात काय भूमिका पार पाडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा >>>पाच मित्र…भरधाव कार…इंस्टावर रिल टाकण्यासाठी मोबाईल हातात घेतला अन्…
कारण हा विनोबा भावे उड्डाणपुल लवकरात लवकर वाहतूकसाठी खुला व्हावा म्हणून भाजपचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी मंगळवारी विधिमंडळाच्या पायरीवर बसून सरकारचे लक्ष वेधले होते.त्यावर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तत्पर दखल घेण्याची हमी दिली होती. मात्र ब्लॉक जाहीर झाल्याचे माहित होताच खासदार जागेवर पोहचले व त्यांनी संधी साधली, अशी चर्चा सूरू झाली आहे.
२०१६ मध्ये या पुलाच्या बांधकामास सुरवात झाली. नगर येथील शेख एन्टरप्रायजेस यांना कंत्राट मिळाले. बोस्टिंग गर्डर पूल रद्द करीत ओपन वेब गर्डर करण्याचा महत्वाचा बदल झाला. मात्र तीन वेळा काम रद्द होण्याचा प्रकार घडला. या पुलामुळे सावंगी, बोरगाव, सालोड, दयालनगर, पुलफैल, आनंदनगर व लगतच्या परिसरातील लोकांना वाहतुकीत दिलासा मिळणार.