लोकसत्ता टीम
गडचिरोली : मोबाईल चार्जर दिले नाही म्हणून एका उपहार गृहात काम करणाऱ्या १९ वर्षीय युवतीला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना आरमोरी शहरात घडली. हा सर्व प्रकार ‘सीसीटीव्ही’त कैद झाल्याने उघडकीस आला. या प्रकरणानंतर फरार असलेल्या दोन गुंड प्रवृत्तीच्या युवकांना १९ ऑगस्टरोजी पोलिसांनी अटक केली आहे. सोहेल शेख (३०) रा. बर्डी वॉर्ड व अयुब पठाण (३८) रा. कासार मोहल्ला आरमोरी अशी आरोपींची नावे आहेत. मारहाणीची चित्रफित सार्वत्रिक होताच जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.
आरमोरी येथील वडसा मार्गावर असलेल्या शिवम रेस्टॉरंटमध्ये मागील नऊ महिन्यांपासून पिडीत युवती काम करीत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आरोपी सोहेल व त्याची पत्नी रेस्टॉरंटमध्ये डोसा खाण्यासाठी आले. दरम्यान सोहेल पत्नीला रेस्टॉरंटमध्ये सोडून बाहेर कामासाठी निघून गेला. सोहेलच्या पत्नीने युवतीस मोबाईल चार्जर मागितला. मालकाचा आदेश असल्याने मी तुम्हाला चार्जर देऊ शकत नाही, असे उत्तर युवतीने दिले. यानंतर सोहेलच्या पत्नीने युवतीशी हुज्जत घातली. या घटनेची माहिती तिने सोहेलला दिल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात तो रेस्टॉरंटमध्ये पोहोचला. त्याने काउंटरवर बसलेल्या युवतीला मारहाण सुरु केली.केस ओढून जवळ असलेल्या टेबलवर जोरजोराने डोके आपटले. एवढ्यावरच न थांबता तिचे केस धरून फरफटत नेले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सोहेरेस्टॉरंटमध्ये असलेल्या सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला. लने फोन करून १० ते १५ युवकांना बोलावून घेतले. यापैकी आरोपी अयुब पठाण याने देखील युवतीला मारहाण केली.
आणखी वाचा-रक्षाबंधनाला सोने घ्यायचा विचार करताय? पण, दरात मात्र…
दरम्यान, हॉटेल मालकाने आणखी मारू नये म्हणून समयसूचकता दाखवीत तिला मागील खोलीत नेऊन बंद केले. आरोपी सोहेलने स्वतःच पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सदर युवतीस ताब्यात घेतले. मात्र, सोहेल व त्याचा मित्र अयुब हेच खरे आरोपी असल्याचे सीसीटीव्हीवरून पोलिसांच्या लक्षात आले. युवतीच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी सोहेल शेख व अयुब पठाण यांच्याविरोधात विनयभंग, लज्जास्पद वर्तणूक, अश्लील शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला. दोघेही आरोपी गुंड प्रवृत्तीचे असून तेव्हापासून दोघेही फरार होते. १८ ऑगस्टरोजी मारहाणीची चित्रफित सार्वत्रिक झाल्यानंतर जिल्ह्यात संताप व्यक्त होऊ लागला होता. १९ ऑगस्टला पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे करीत आहे.