यवतमाळ : उन्हाच्या झळा तीव्र होत असताना पाणीटंचाईचे चटके सुद्धा नागरिकांना बसत आहे. पाण्यासाठी भटकंती करताना पारधी बेड्यावरील एका लहान मुलीचा नदीत बुडून मृत्यू झाला. वेदिका सुरेश चव्हाण (१२), असे मृत मुलीचे नाव आहे. आर्णी तालुक्यातील कठोडा येथील पारधी बेड्यावर रविवारी घडलेल्या या घटनेने शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील फोलपणा आणि प्रशासकीय अनास्थेचे भीषण वास्तव समोर आणले आहे. वेदिकाचा मृत्यू हा शासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा बळी असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
शासन एकीकडे ’हर घर जल’ योजनेच्या माध्यमातून घराघरात पाणी पोहोचल्याचे दावे करत आहे. तर दुसरीकडे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या पारधी बेड्यावर अद्यापही मुलभूत सुविधा पोहोचल्या नसल्याचे या घटनेने स्पष्ट झाले. कठोडा गावाजवळील या पारधी बेड्यावर सुमारे २०० नागरिक मूलभूत सुविधांच्या अभावात अनेक वर्षांपासून जगत आहेत. येथे एक हातपंप आहे. तोही उन्हाळ्यात कोरडा पडतो. पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिला आणि मुलांना दररोज जीव धोक्यात घालून काही अंतरावरील अरुणावती नदीवरच अवलंबून राहावे लागते. रविवारी सकाळी वेदिका गावातील महिलांसोबत याच नदीत पाणी भरण्याच्या प्रयत्नात पाय घसरून नदीच्या डोहात बुडाली आणि तिचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या महत्वाकांक्षी ’हर घर जल’ या जलजीवन मिशनच्या योजनेत या वस्तीचा समावेश आहे. मात्र, ही योजना येथे पूर्णतः फसल्याचे आढळले. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही या वस्तीपर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचलेले नाही. वेदिकाच्या मृत्यूप्रकरणी आर्णी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. वेदिकाच्या मृत्यूने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि मूलभूत सुविधा पुरवण्यातील अपयशावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पारधी बेड्यावरील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पाण्याची सोय नसल्याने बालिकेचा मृत्यू होऊनही प्रशासकीय अधिकार्यांकडून या घटनेची गांभीर्याने नोंद घेतली गेली नाही. स्थानिक आमदार निवडणुकीनंतर या बेड्याकडे फिरकलेही नाहीत, असे येथील नागरिकांनी सांगितले.
काठोडा, रुद्रापूर, पारधी बेडा ही गटग्रामपंचायत आहे. जलजीवन मिशन योजनेत या वस्तीचा समावेश आहे. तीन वर्षांपूर्वी पाईपलाईन टाकली. टाकी बांधली, पण पाण्याचा स्रोतच जोडला नाही. पारधी बेड्यावर जलजीवन मिशनचा पूर्णतः बट्ट्याबोळ उडाला आहे. अधिकारी आणि ठेकेदारांच्या अनास्थेचा वेदिकाचा बळी गेला, असे काठोडाचे माजी सरपंच गजेंद्र झळके म्हणाले. सरकारी योजना या वस्तीपर्यंत पोहोचतच नाहीत. उन्हाळ्यात पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागते. वेदिका गेली, आणखी किती बळी गेल्यावर शासनाला जाग येईल? आमच्या जीवाचे काही मोल आहे की नाही, असा संतप्त प्रश्न वेदिकाचे नातेवाईक इशू लक्ष्मण माळवे यांनी विचारला आहे.