अमरावती : कोणतेही प्राणी,वस्तू,सजीव,निर्जीव,इत्यादीबद्धल मनामध्ये आपुलकी,स्नेह,जिव्हाळा,आदर,निर्माण होणे आणि ती गोष्ट सहवासात,जीवनात हवीशी वाटणे म्हणजे प्रेम. आपले दैनंदिन जीवन जगत असताना सहवासात येणाऱ्या कोणत्याही गोष्टीशी,व्यक्तींशी भावनिक,मानसिक,शारीरिक,संबंध जोडले गेल्यामुळे निर्माण झालेला स्नेह म्हणजे प्रेम होय. पण, हेच अलवाल प्रेम आजकाल वेगळयाच वाटेने निघालेले दिसत आहे. चुकीच्या वयात चुकीच्या गोष्टी केल्या की परिणामही चुकीचेच घडतात. अमरावतीही असेच काहीसे प्रकरण घडले आहे.

या घटनेत एका तरुणीची हत्या झाली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने एका तरुणीची चाकूने हल्ला चढवून ही हत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवार, ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील सुपर एक्स्प्रेस हायवेवरील एका मंदिराजवळ घडली. घटनेनंतर मारेकरी तरुणी फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. शुभांगी (२६) रा. आर्वी, वर्धा असे मृत युवतीचे नाव आहे. शुभांगीच्या परिचयातील तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. त्याचे शुभांगीसोबतही प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याच्या प्रेयसीला होता. त्या कारणावरून त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे तरुणाने आपल्या प्रेयसीची शुभांगीसोबत भेट घालून देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मंगळवारी शुभांगी ही एका मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत आली होती. त्यामुळे तरुणाने आपल्या प्रेयसीची शुभांगीसोबत भेट घालून देण्यासाठी रात्री ८ वाजताच्या सुमारास तिला सुपर एक्स्प्रेस हायवेवरील एका मंदिराजवळ बोलाविले. शुभांगी तेथे पोहोचल्यावर तरुणाच्या प्रेयसीने तिच्यासोबत वाद घातला. या वादात तिने शुभांगीवर चाकूने हल्ला चढविला. त्यात ती गंभीर जखमी झाली. तरुणाने शुभांगीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट यांनी आपल्या ताफ्यासह जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. पोलीस उपायुक्त गणेश शिंदेही तेथे पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलीस फरार झालेल्या तरुणीचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा…भाजपच्या दिल्लीतील विजयी सभेतील गडकरींच्या अनुपस्थितीची चर्चा

गेल्‍या दोन दिवसांत पाच जणांच्‍या हत्‍येच्‍या घटना घडल्‍याने शहर हादरून गेले आहे. सोमवारी सायंकाळी अजय विजय वानखडे (२५) रा. खरकाडीपुरा याची हत्‍या करण्‍यात आली होती. तो कोतवाली ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी घडलेल्या प्रेमराज उर्फ माँटी अनिल गोले (२५) रा. दत्तवाडी, महाजनपुरा याच्या हत्या प्रकरणातील फिर्यादी होता.

हे ही वाचा…भाजप नेते मुन्ना यादवची कबुली, म्हणाले ” होय मी पोलिसांना शिवीगाळ केली, पण .. “

घटनेच्या वेळी तो त्याच्यासोबत असल्याची माहिती बडनेरा पोलिसांना मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी तपास आरंभला. या प्रकरणी गौरव विलास पाटील (२५) रा. हनुमाननगर याने बडनेरा ठाण्यात तक्रार दाखल केली. अजय हा सोमवारी दुपारी प्रेमराज उर्फ माँटीच्या अंत्यविधीसाठी हिंदू स्मशानभूमी येथे उपस्थित होता. तेथे आरोपीसुद्धा होते. त्यावेळी आरोपींनी अजयला आपल्या सोबत नेले. त्यानंतर अंजनगाव बारी मार्गावरील जंगलात नेऊन अजयची हत्या करण्यात आली, असे गौरवने तक्रारीत नमूद केले. तक्रारीवरून पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.