नागपूर : क्रीडा प्रशिक्षण घेताना १३ वर्षीय मुलीला तिच्या सहकारी खेळाडूने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मुलीने प्रियकराच्या सांगण्यावरुन कुटुंबियांशी बोलणे सोडले. मुलीने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे धक्का बसलेल्या आईने भरोसा सेलमध्ये तक्रार केली. पोलिसांनी समूपदेशन करीत तिला प्रेमाच्या मोहजालातून बाहेर काढले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरात राहणारी ३६ वर्षीय महिला आपल्या १३ वर्षीय मुलीला घेऊन मंगळवारी दुपारी भरोसा सेलमध्ये आली. पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांची भेट घेतली. मुलीला बाहेर बसवले आणि आईने आपली समस्या मांडली. ‘मुलगी सातव्या वर्गात शिकत असून ती गेल्या काही दिवसांपासून एका क्रीडा प्रकारात सहभागी आहे. ती सरावासाठी मैदानावर जाते. काही दिवसांपासून तिने आई-वडिल आणि बहिणीशी बोलणे सोडले. घरी कमी आणि मैदानावर जास्त वेळ घालवते. तिचे शिक्षणातून लक्ष उडाले असून ती अभ्याससुद्धा करीत नाही. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्यास ती अजिबात बोलत नाही,’ अशी तक्रार आईने केली. ती अगदी पहाटे निघून जाते आणि अनेकदा रात्री उशिरा घरी येते. मुलीने अचानक अशा बदललेल्या वागण्याने   तिचे कुटुंबीय काळजीत पडले. तिच्या आईने पोलिसांना याबाबत सविस्तर माहिती दिली. त्या महिलेची तक्रार लिहून घेण्यात आली. मुलीशी संवाद साधण्यात आला. मात्र, ती पोलिसांना सहकार्य करीत नव्हती.

हेही वाचा >>>नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….

समूपदेशनानंतर उलगडले प्रेमसंबंध

सीमा सूर्वे आणि समूपदेशक अनिता गजभीये यांनी मुलीची  आस्थेने विचारपूस केली. त्यावेळी तिने एका खेळाडूच्या प्रेमात पडल्याचे सांगितले. ‘प्रियकराशी बोलण्यासाठी आईचा भ्रमणध्वनी घेत होते. मात्र, आई नेहमी आरडाओरड करीत होती. त्यामुळे प्रियकराने कुटुंबियांशी अबोला धरण्यास सांगितले होते. त्याच्या प्रेमापोटी मी असे वागत होती.’ असे तिने सांगितले.  सातवीचा अभ्यास आणि खेळाडू युवकाने जाळ्यात ओढण्याचे कारण मुलीला समजून सांगण्यात आले. भविष्यात होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाची माहिती देण्यात आली.

मुलीने आईला मारली मिठी

‘मुलीने प्रियकराला फोन केला आणि माझ्याशी भविष्यात लग्न करणार का?’ असा प्रश्न केला. त्यावेळी प्रियकराने चक्क नकार देऊन पुन्हा फोन न करण्याची ताकीद दिली. मुलीच्या डोक्यातून प्रेमाचे भूत उतरले. प्रियकरासाठी कुटुंबियांशी अबोला धरणाऱ्या मुलीचे खाडकन डोळे उघडले. तिने आईकडे धाव घेऊन घट्ट मिठी मारली आणि रडायला लागली. तिने आईची माफी मागितली. अभ्यासात मन लावून लक्ष देईल, असे वचन  पोलिसांना दिले. दोघेही मायलेकी समाधान व्यक्त करीत घराकडे परतल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl stops talking to family at boyfriend behest nagpur news adk 83 amy