नागपूर : तीन वर्षांपूर्वी कपिलनगर हद्दीतून बेपत्ता झालेल्या बालिकेला शोधून काढण्यात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला यश आले. पथकाने तिला अकोल्यातून ताब्यात घेतले. चौकशीत तिने प्रियकराशी लग्न केल्याचे समजले.
कपिलनगर ठाण्यांतर्गत राहणारी पीडिता ३१ ऑगस्ट २०२० च्या सकाळी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जात असल्याचे घरी सांगून गेली होती. त्यानंतर ती परतली नाही. यामुळे चिंतीत कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला, मात्र ती मिळाली नाही. १ सप्टेंबर रोजी कपिलनगर ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. कपिलनगर पोलिसांनीही तिला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र सुगावा लागला नाही. त्यामुळे प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या एएचटीयूकडे सोपविण्यात आला.
हेही वाचा >>> वर्धा: मायलेकावर दवाखान्यात खर्च होतो म्हणून मुलास आपटले, पित्यावर गुन्हा दाखल
पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून तिचा शोध घेण्यात आला. ती अकोलाच्या रिधोरा येथे असल्याचे समजले. तत्काळ एक पथक अकोला येथे रवाना करण्यात आले. पथकाने बालिकेला ताब्यात घेतला. आता ती २० वर्षांची आहे आणि तिने प्रियकराशी लग्न केले आहे. पोलिसांनी तिच्या प्रियकरालाही ताब्यात घेतले. दोघांनाही पुढील कारवाईसाठी कपिलनगर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. ही कारवाई एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ यांच्या मार्गदर्शनात समाधान बजबळकर, लक्ष्मीछाया तांबुस्कर, ज्ञानेश्वर ढोके, मनीष पराये, दीपक बिंदाने, शरीफ शेख, ऋषिकेश डुबरे, आरती चौहान आणि अश्विनी खोडपेवार यांनी केली.