नागपूर : प्रेयसीचे लग्न झाल्यानंतरही प्रियकराने पूर्वीप्रमाणेच शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, प्रेयसीने संबंधास नकार देताच प्रियकराने तिचे अश्लील छायाचित्र तिच्या पतीला आणि गावातील व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये प्रसारित केले. याप्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राज किरण (२९) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय तरुणीचे लग्नापूर्वी राज किरण याच्यासोबत मैत्री होती. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण दोघांच्याही कुटुंबीयांना लागली. तरुणीच्या कुटुंबीयांनी तिला राजशी संबंध तोडण्यास सांगितले. मात्र, दोघांनाही विरह सहन होत नव्हता. त्यामुळे दोघांच्या चोरून-लपून भेटी सुरू होत्या. कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी तिचे लग्न लावून दिले. लग्न झाल्यानंतर तिला मुलगा झाला आणि ती संसारात रमली.
गेल्या १३ जूनला ती मुलासह गावात आली. त्यावेळी राजने तिची भेट घेऊन तिला बाहेरगावी हॉटेलमध्ये सोबत येण्यास विचारले. तिने नकार देताच मुलाचे अपहरण करून ठार मारण्याची धमकी दिली.त्यामुळे ती राजसोबत दुचाकीवर बसून गेली. राजने तिचे मोबाईलने अश्लील छायाचित्र आणि चित्रफीत काढली. तेव्हापासून दोघांचे पुन्हा प्रेमसंबंध जुळले. परंतु, गावात अनेकांच्या तोंडी दोघांच्या प्रेमसंबंधाची चर्चा असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिची समजूत घालून पतीकडे पाठवले.
हेही वाचा : गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातला जाणार : सुधीर मुनगंटीवार
२४ सप्टेंबरला ती गावात आली असता राजने पुन्हा तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. परंतु तिने नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात राजने तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफीत तिच्या पतीच्या मोबाईलवर पाठवली. तसेच गावातील काही व्हॉट्सॲप ग्रुपमध्येही तिचे अश्लील छायाचित्र पाठवले. ही बाब तिच्या आईवडिलांना कळली. त्यामुळे प्रेयसीने रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी राजला अटक केली.