नागपूर : प्रेयसीच्या बहिणीला लग्नाचे आमिष दाखवून दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफीत तयार केली. छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन गेल्या ९ महिन्यांपासून लैंगिक शोषण केले. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल होताच दोघांनीही शहरातून पळ काढला. मोहम्मद अरसलान अल्ताफ शेख (३०, तोहितनगर, मोठा ताजबाग)आणि मोहम्मद सर्फराज ऊर्फ राजा खान अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदनवनमध्ये राहणारी २१ वर्षीय तरुणी श्रद्धा (काल्पनिक नाव) हिच्या बहिणीशी आरोपी मोहम्मद अरसलान अल्ताफ शेख (३०, तोहितनगर, मोठा ताजबाग) याचे प्रेमसंबंध होते. त्याला भेटायला जाण्यासाठी बहीण श्रद्धाला सोबत नेत होती. दरम्यान, मो. अरसलानने जानेवारी महिन्यात घरी कार्यक्रम असल्याचे सांगून श्रद्धाला बोलावले. ती पोहचल्यानंतर घरी कुणीच नव्हते. त्यामुळे श्रद्धाने त्याला विचारणा केली. त्याने श्रद्धाला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने बहिणीचा होणारा पती असल्याची जाण करून देत त्याला नकार दिला. त्याने लगेच बहिणीशी लग्न न करण्याची धमकी दिली. बहिणीचे लग्न तुटू नये म्हणून ती शारीरिक संबंधास तयार झाली. मो. अरसलानने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे काही अश्लील छायाचित्र आणि चित्रफीत तयार केली. त्यानंतर तो वारंवार तिला बहिणीशी होणारे लग्न मोडण्याची धमकी देऊन अत्याचार करायला लागला.
गेल्या १५ ऑक्टोबरला मो. अरसलानने श्रद्धाला घरी बोलावले. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर लगेच त्याचा मित्र मोहम्मद सर्फराज ऊर्फ राजा खान मोहम्मद आसीफ शेख (२१, मोठा ताजबाग) याला बोलावून घेतले व श्रद्धाला सर्फराजशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. तिने नकार देताच सर्फराज खानने तिचे अश्लील छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली. बदनामी होऊ नये म्हणून तिने तयारी दर्शवली. त्यानंतर दोघांनीही वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. या दोघांच्याही लैंगिक अत्याचाराला कंटाळून तिने नंदनवन पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी मोहम्मद अरसलान आणि मोहम्मद सर्फराजविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.