वर्धा : प्राणवायूचा मोठा स्रोत म्हणून वृक्षवल्ली मानवाचा आधार ठरतो. वाढत्या शहरीकरणामुळे त्यांच्यावर संक्रांत येत आहे. वर्धेतही अशीच संक्रांत सत्तर वर्षे जुन्या झाडांवर आली होती. रस्ता रुंदीकरणात आड येणाऱ्या या झाडांची तोड पर्यावरण प्रेमींनी आंदोलन करून थांबविली.
मात्र शहर सौंदर्य वाढावे म्हणून झाडे तशीच ठेवून त्याच्या खोडाला पेव्हर ब्लॉक्स बसविण्यात आले. हा तर झाडांचा गळा आवळण्याचा प्रकार असल्याचे निसर्गप्रेमी व वैद्यकीय जागृती मंचचे डॉ. सचिन पावडे यांच्या निदर्शनास आले. त्यांना अनेकदा नागपूरला जावे लागत असल्याने ते या झाडांवर लक्ष ठेवून होते. वर्षभरात या झाडांची पाने गळून पडत ती मरणोन्मुख होत चालल्याचे त्यांना दिसून आले.
अखेर झाडांची ही घुसमट थांबावी म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना ही बाब कळविली. झाडे तोडल्या गेली नाहीत मात्र त्यांचे प्राण घेण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न होत आहे, असे त्यांनी नमूद केले. पेव्हर ब्लॉक्स घट्ट लावण्यात आल्याने ही झाडे हळूहळू जीव सोडत असल्याची बाब स्वतः निसर्गप्रेमी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी मनावर घेतली. त्वरित बांधकाम विभागाचे अभियंता आचार्य यांना यासाठी चमू गठित करण्याची सूचना केली.
हेही वाचा – नागपूर : आंबेडकर भवन पाडणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा; न्यायालयाचा पोलिसांना आदेश
चमूने याबाबत काय करता येईल म्हणून विचार केला. खोडाशी आवळून बसविण्यात आलेल्या ब्लॉक्सला काढण्यात आले. खोडाच्या सभोवताल चार फुटाचा परिसर मोकळा करून पाणी झिरपण्याचा मार्ग मोकळा झाला. प्राणवायूचे कोठार खुले झाले.