नागपूर : शहरातील सिव्हील लाईन्समधील मुख्यमंत्री निवासापुढील ‘वॉकर स्ट्रीट’वर येणाऱ्या नागरिकांचे विविध भाव दर्शविणारे पुतळे (स्टॅचू) साकारण्यात आले आहे. विदेशाच्या धरतीवर नागपुरात राबवलेला हा प्रकल्प सर्वांचे लक्ष वेधणारा ठरला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी याचे लोकार्पण झाले.
मुख्यमंत्री निवास ‘रामगिरी’ बंगल्यापुढील पुढील मार्ग वॉकर स्ट्रीट म्हणून ओळखला जातो. येथे फिरायला येणाऱ्या नागपूरकरांचे भाव पुतळेरूपात साकारण्यात आले आहेत. ग्रीन फाऊंडेशनद्वारे येथे ‘वॉकर पॅराडाईज’ साकारण्याची संकल्पना मांडली. नागपूर महापालिकेने जागेची उपलब्धता आणि जयस्वाल निको ग्रुपने पुतळे निर्मितीची जबाबदारी स्वीकारून या संकल्पनेला साथ दिली.
हेही वाचा >>> अकोला : अर्थसंकल्पासाठी जनतेकडून ४० हजार सूचना, सरकारकडून बहुतांश सूचनांची दखल
‘वॉकर पॅराडाईज’मध्ये शहरातील तरुणाई, ज्येष्ठ, चिमुकले, महिला या सर्वांचे भाव साकारले आहे. जॉगर, रनर, रिस्ट वॉकर यासह वजन कमी करण्यासाठी नियमित फिरायला येणारी महिला, श्वानाला घेऊन फिरणारी व्यक्ती, चिमुकलीला फिरायला घेऊन आलेली आई, नव्या युगातील तरुणी, तरुणांचा ग्रुप, काठीच्या आधाराने फिरणारे वृद्ध असे ११ प्रकारचे पुतळे येथे उभारण्यात आले आहेत. नितीन गडकरी यांनी या संकल्पनेचे कौतुक करीत कार्यावर समाधान व्यक्त केले. ग्रीन फाऊंडेशनतर्फे अनिल अग्रवाल, निशांत गांधी यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.