चंद्रपूर : जगाच्या पाठीवर पर्यावरणात झपाट्याने होणारे बदल आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी चंद्रपुरात १६, १७ व १८ जानेवारीला ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज-२०२५’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार असून यानिमित्ताने चंद्रपुरातून ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या विरोधातील शंखनाद केला जाईल. चंद्रपूर पर्यावरण बदलासंदर्भात धोरण तयार करण्यात मोठे योगदान देईल. भविष्यातील ३० वर्षांचे बिजारोपण व्हावे, या दृष्टीने परिषदेतून प्रयत्न केले जाणार आहे, अशी माहिती माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वन अकादमी येथे एनएनडीटीच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, आयुक्त विपीन पालिवाल, एनएनडीटी बल्लारपूर कॅम्पस संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रपरिषदेत मुनगंटीवार यांनी या परिषदेचे महत्त्व विशद केले. १६ जानेवारीला प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात राज्यपालांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्य अतिथी म्हणून मुनगंटीवार उपस्थित राहतील. परिषदेच्या दुसऱ्या सत्रात राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक ऑनलाइन सत्रात मार्गदर्शन करतील.

हेही वाचा – “…तर चंद्रपूर वीज केंद्रातील दोन संच बंद करू,” मुनगंटीवार यांचा इशारा

पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात तात्कालिक नव्हे तर स्थायी स्वरुपाचे कार्य आवश्यक आहे. केवळ चंद्रपूरच्या नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातील वातावरणात होणारे बदल, ‘ग्लोबल वॉर्मिंग’, पर्यावरण संवर्धन या संदर्भात राज्यात स्थायी समिती तयार करण्याचा निर्णय झाला आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये १७० हून अधिक संशोधन पेपर्सचे सादरीकरण, जागतिक हवामान तज्ज्ञांचे मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण व युवा नेतृत्वाला प्रोत्साहन, आदी उपक्रम होणार आहेत. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासाठी निश्चित महत्त्वपूर्ण योगदान मिळेल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. परिषदेत पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.

हेही वाचा – सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळूनही दर घसरणीला…

चंद्रपुरातील ‘क्लायमेट चेंज’ची ही चळवळ आधी राज्यव्यापी आणि नंतर देशव्यापी करायची आहे. त्यासाठी प्रत्येकाने काम करावे. या ‘क्लायमेट चेंज’नंतर आरोग्य आणि शेतीवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. जैविक शेती, सेंद्रीय शेती यामध्ये कार्य केल्यास प्रदूषणाला तोंड देता येईल. चंद्रपूरमध्ये प्रदूषणाची धोक्याची पातळी अधेमध्ये वाढलेली असते. उद्योगांमुळे हे होत आहे. उद्योग आवश्यकच आहेत, पण हे उद्योग प्रदूषण वाढविणारे नकोत. त्यामुळे उद्योग आणि प्रदूषण याचे संतुलन साधावे लागेल. – सुधीर मुनगंटीवार, आमदार.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Global warming chandrapur international conference on climate change 2025 discussion on environmental change sudhir mungantiwar rsj 74 ssb