डॉ. अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन; डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार प्रदान

नागपूर : ग्लोबल वॉर्मिगच्या वाढत्या तीव्रतेमुळे पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यात इंधन प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास यासोबतच ऊर्जेचा अतिवापरही कारणीभूत आहे. ऊर्जेचा हाच अतिवापर देशाला विनाशाकडे नेऊ शकतो, त्यावर उपाय शोधणे हे भारतासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. वनराई फाऊंडेशनचा दिवंगत डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार आज गुरुवारी त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार अजय संचेती तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग, लोकसत्ताचे

संपादक गिरीश कुबेर, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते  डॉ. अनिल काकोडकर यांना डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी डॉ. काकोडकर म्हणाले, अहिंसेचा गांधी विचार आणि अण्वस्त्र यांचा मेळ साधण्याचे कार्य मी आयुष्यभर केले. भारताने अणुचाचणी केल्यानंतर देशावर आर्थिक निर्बंध घालण्यात आले. त्यावेळी हे निर्बंध दूर करण्यासाठी अमेरिकेसोबतच आपल्या लोकांशीही संघर्ष करावा लागला. कामाच्या गरजेनुसार भूमिका बदलत असल्याने थोरियमवर काम करताना मध्येच युरेनियम कशाला हवे, असे प्रश्न विचारले गेले. वरवर वाटणारा हा विरोधाभास आतून कसा परस्परपूरक आहे, हे सप्रमाण स्पष्ट करताना मीही समृद्ध होत गेलो. आज शहर व गाव यातील विषमता दूर करायची असेल तर तंत्रज्ञानावर आधारित ग्रामीण विकासाची संकल्पना अंमलात आली पाहिजे. त्यासाठीच मी ऊर्जा, शिक्षण आणि विज्ञानाधारित ग्रामीण विकासावर काम करण्याचे ठरवले आहे. त्याची सुरुवात गडचिरोली, पंढरपूरसारख्या ग्रामीण भागात झाली आहे, याकडेही डॉ. काकोडकर यांनी लक्ष वेधले. डॉ. अभय बंग म्हणाले, सध्या नदीजोड प्रकल्पांतर्गत वैनगंगा नदीतील अतिरिक्त पाणी जलसंकट असलेल्या दुसऱ्या भागात वळवण्याचा घाट रचला जात आहे, परंतु हा विध्वंसक निर्णय आहे. नदीकाठी केवळ माणसांची वस्ती नसते तिथे एक संस्कृती नांदत असते. आधी जिथे नदी असायची तेथे माणसे वस्ती करायची. आता जिथे माणसे आहेत तिथे नदी नेली जात आहे. विदर्भातील राजकीय आवाज क्षीण असल्याने असे घडत आहे. हे निसर्गाच्याच विरोधात नाही तर नदीकिनारी वसलेल्या लोकांच्या जलअधिकाराचाही भंग आहे. हे सरकारला व विशेषत: नागपूर गृहनगर असलेल्या सत्ताधीशांना कळत नाही का, असा खडा सवालही डॉ. बंग यांनी विचारला.

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर म्हणाले, मराठी माणसाला सत्ता व अधिकाराच्या वलयाचे जास्त आकर्षण असते. साध्या माणसांच्या कर्तृत्वाचे मोठेपण आपल्याला उमगत नाही. डॉ. काकोडकर असेच मोठे कर्तृत्व असलेले साधे व्यक्ती आहेत. अमेरिकेचा विरोध असतानाही त्याला न जुमानता काकोडकरांनी देशहितासाठी अणुऊर्जेवर काम सुरूच ठेवले. काकोडकर यांचे जगण्याचे तत्त्वज्ञान व ते मांडण्याचे तत्त्वज्ञान यात कुठलाच फरक नाही. म्हणून ते श्रेष्ठ ठरतात. आज त्यांच्यासारखे समर्पण दुर्मिळ गोष्ट झाली आहे. बुद्धिवंतांचा परदेशात जाणारा ओघ समाजासाठी धोकादायक आहे, याकडे कुबेर यांनी लक्ष वेधले. अजय संचेती यांनी अध्यक्षीय भाषणातून डॉ. काकोडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. डॉ. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक, अजय पाटील यांनी संचालन तर आभार किशोर धारिया यांनी मानले. यावेळी रवींद्र धारिया, प्रा. दिलीप पेशवे आणि समीर सराफ उपस्थित होते.

..म्हणून लोकसत्ताची प्रतीक्षा असते

कुठलीही वृत्तवाहिनी बघा एकाच माणसाच्या रटाळवाण्या गोष्टी सतत सुरू असतात. या गोष्टींमधील काय खरे आणि काय खोटे, हे जाणून घेण्यासाठी मी दुसऱ्या दिवशीच्या लोकसत्ताची आतुरतेने प्रतीक्षा करीत असतो. या दैनिकातील संपादकीय दोन पाने सभोवताल घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे वस्तुनिष्ठ व निष्पक्ष विश्लेषण करणारी असतात, अशा शब्दात डॉ. बंग यांनी लोकसत्ताच्या व्रतस्थ पत्रकारितेचा गौरव केला.

Story img Loader