नागपूर : गो फर्स्ट एअरलाईन्स दिवाळखोरीत निघाल्याने त्यांच्या नागपूर ते मुंबई तसेच इतर सेवा बंद झाल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात गो फर्स्टच्या सेवा बंद झाल्याने साहजिकच इतर एअरलाईन्सकडे प्रवाशांचा ओढा वाढला. त्यामुळे इतर विमान कंपन्यांनी प्रवास भाड्यात मोठी वाढ केली आहे.
एअर इंडियाचे मंगळवारी सकाळी ७:३० वाजता मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एका तिकीटाचे भाडे ३९ हजार रुपये आकारण्यात आले. हे दर रिक्त असलेल्या ‘अ’ दर्जाच्या दोन आसनासाठी होते आणि ते एअर इंडियाच्या सिस्टिमवर दर्शवण्यात येत होत, असे एका प्रवाशाने सांगितले.
हेही वाचा >>>रात्री वीज गेल्याने नागपूरकरांची झोपमोड, ‘या’ भागात झाला काळोख
एअर इंडियाचे एआय-६२८ हे विमान मंगळवारी सकाळी ७:३० वाजता नागपुरातून मुंबईला निघाले. सोमवारी या विमानात दोन आसने शिल्लक होती. त्यांच्या दराबाबत चौकशी केली असता एका तिकिटाचे दर ३९ हजार रूपये असल्याचे सांगण्यात आले. नागपुरातून मुंबईला मंगळवारी जाणाऱ्या अन्य विमान कंपन्यांचे दर सोमवारी सिस्टिमवर ८ ते १० हजार रूपये दर्शविण्यात आले होते. ‘डायमिक फेअर’ बुकिंग वेळ, पुरवठा आणि मागणी नुसार दर बदलतात. त्यामुळे केवळ दोन आसन शिल्लक असताना सिस्टमध्ये तिकीटाचे दर वाढले असावेत, असे एअरलाईन्स अधिकाऱ्यांनी सांगितले.