लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ : येथील श्री हनुमान आखाड्यातील लाल मातीच्या हौदात शनिवारी रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या हौदाच्या दंगलीत बीडचा गोकुळ आवारे पहेलवान प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला. तर पुण्याचा राहुल सुळ उपविजेता ठरला.

जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ही कुस्तीस्पर्धा घेण्यात आली. माजी खा. विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजी आ. कीर्ती गांधी, जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सचिव अनिल पांडे, संघटक प्रताप पारसकर, किशोर दर्डा आदींच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले.

प्रथम क्रमांकाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत बीडच्या गोकुळ आवारे पहेवानाने पुण्याच्या राहुल सूळ पहेलवानाला दहा मिनिटाच्या तोडीस तोड कुस्तीत संधी साधून चारी मुंड्या चित केल्या. गोकुळ आवारेला सुभाष दादा बाजोरिया स्मृती प्रशांत बाजोरिया पुरस्कृत  ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी आंतरराष्ट्रीय पहेलवान रविराज चव्हाण पुणे व नॅशनल चॅम्पियन कौतुक डाफळे पुणे यांच्यात लढत झाली. मुख्य लढतीपेक्षा प्रेक्षकांनी या लढतीला अधिक दाद दिली. तब्बल १४ मिनिट दोघांत झटापट झाली दोघेही ताकदीच्या व डावाच्या जोरावर मारण्याचा प्रयत्न करीत होते, कुस्ती तोडीस तोड होत होती. इतक्यात विजेच्या चपळाईने कौतुक डाफळेने रविराज चव्हाणला खाली घेत हौदाबाहेर लोटले. रविराज हौदाबाहेर गेल्याने पंचाने कौतुक डाफळे ला विजयी केले. त्याने ४१ हजार रुपयाचे बक्षीस जिंकले. ३१ हजार रूपयाच्या तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी विजय शिंदे वाशिम विरुद्ध सुहास गोडगे पुणे यांच्यात चित्तथरारक लढत झाली. या तुल्यवळ लढतीत विजय पैलवानने १२ व्या मिनिटात सवारी तोडून सुहास गोडगे पैलवानला अस्मान दाखविले.

आणखी वाचा-बुलढाणा : भरधाव दुचाकी झाडाला धडकली; एक ठार, दोन गंभीर

चौथ्या क्रमांकाच्या २५ हजार रुपयांच्या बक्षिसासाठी शुभम सावंत सोलापूर आणि शुभम मुसळे पुणे यांच्या चीतपट कुस्ती झाली. अनुभवी शुभम मुसळेने अवघ्या तीन मिनिटात ही कुस्ती जिंकली. पाचव्या क्रमांकाच्या २१ हजार रुपयांच्या लढतील वाशिमच्या शाहरुख बेनीवाले पैलवानाने असद पहेलवानला दीड मिनिटात पराभूत करुन कुस्ती जिंकली. रवी यजमळकर वाशिम विरुद्ध शंकर पहेलवान हिंगोली यांच्यातील १५ हजार रुपयांच्या सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत वाशिमच्या रवी पहेलवानने जेतेपद पटकाविले.

सातव्या क्रमांकाच्या १० हजार रुपयांची कुस्तीत जालन्याच्या अविनाश नवकर पहेलवानने शोएब पहेलवान इंदौर याला चिवट झुंजीत हरविले. सात हजार रुपयांच्या कुस्तीत अविनाश जाधव पहेलवान हिंगोली याने सागर पहेलवान लातूर याचा पराभव केला. पाच हजार रुपयांच्या कुस्तीचा निकाल गुणांवर घेण्यात आला. पुसदच्या यश राठोड पहेलवानने नांदेडच्या जरासंघ पैलवानावर पहिला गुण घेत पराभूत केले. तीन हजार रुपयांच्या कुस्तीत भास्कर कदम पहेलवान वाशिम याने अनिकेत पहेलवान बेलोरा याला धोबीपछाड देत बाजी मारली. पांडुरंग पहेलवान हिंगोली याने दोन हजार रुपयांच्या कुस्तीत करण पहेलवानला आसमान दाखविले.

आणखी वाचा-सावधान! बुलढाणा जिल्ह्यात गारपीट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

सात लाख रुपयांच्या भव्य इनामी काटा कुस्त्यांच्या दंगलीत देशभरातील  ३०० पेक्षा जास्त नामवंत मल्लांनी सहभाग नोंदविला. पंच म्हणून अनिल पांडे,मोहम्मद शकील,उद्धव  बाकडे,धनंजय लोखंडे,शशांक मेहता यांनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन नागेश बोराटी यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gokul aware from beed won the kata kusti dangal nrp 78 mrj
Show comments