नागपूर : लग्न सराईच्या काळात सोने- चांदीचे दर विक्रमी उंचीवर पोहचल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली होती. परंतु आता हे दर खाली येत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. शनिवारी नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी ९० हजार रुपये प्रति दहा ग्रामच्याही खाली आले होते. त्यामुळे नागपुरात १ एप्रिलच्या तुलनेत ५ एप्रिलला सोन्याच्या दरात मोठी आपटी बघायला मिळत आहे. तर चांदीचे दरही प्रति किलो तब्बल १२ हजाराहून जास्तने कमी झाले आहे.
लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सराफा व्यवसायिकांकडे ग्राहकांची संख्या वाढली आहे. त्यातच नागपुरात सोन्याचे दर विक्रमी उंचीवर असल्याने ग्राहकांमध्ये चिंता आहे. दरम्यान नागपुरातील सराफा बाजार १ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता उघडल्यावर सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९१ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८५ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५९ हजार ४०० रुपये होते. त्यानंतर सोन्याच्या दरात सतत घसरण बघायला मिळत आहे.
दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात शनिवारी (५ एप्रिल २०२५ रोजी) बाजार उघडल्यावर सोन्याचे दर स्थिर असले तरी चांदीमध्ये जास्तच घसरण बघायला मिळाली. परंतु दुपारी चांदीच्या दरात किंचित वाढ झाली. त्यामुळे दुपारी अडिच वाजता नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ८९ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८२ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६९ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५७ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे पाच दिवसात नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम २ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी २ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी १ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी १ हजार ५०० रुपये घसरल्याचे दिसत आहे. दरम्यान सराफा व्यवसायिकांकडून मात्र सोन्याचे दर येत्या काळात आंतराष्ट्रिय घडामोडी बघता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चांदीच्या दरातही मोठे बदल…
नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर १ एप्रिल २०२५ रोजी चांदीचे दर दर प्रति किलो १ लाख १ हजार ४०० रुपये होते. हे दर पाच दिवसांनी ५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता प्रति किलो ८९ हजार रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरातील बाजारात १ एप्रिलच्या तुलनेत ५ एप्रिल रोजी चांदीचे दर प्रति किलो १२ हजार ४०० रुपयांनी घटल्याचे दिसत आहे.