नागपूर: नागपूरसह राज्यात सर्वाधिक सोने-चांदीची विक्री दिवाळीतील मुहूर्तावर होते. परंतु यंदा दिवाळीतील धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीचे दर चांगलेच वाढले होते. त्यानंतरही ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने व नाणींची खरेदी केली. परंतु लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी नागपुरात सोने-चांदीच्या दरात घसरण झाली. या सोने-चांदीच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपुरात धनत्रयोदशीला मंगळवारी (२९ ऑक्टोबर) बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही (१ नोव्हेंबर) बाजार बंद होताना नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ६०० रुपये होते. परंतु दुसऱ्याच दिवशी शनिवारी (२ नोव्हेंबर) नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७८ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याच्या दरात किंचित घट झाली. त्यामुळे वाढीव दरात सोने- चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडून सध्या सोने- चांदीचे दर जास्त असले तरी देशासह आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील हालचाली बघता पुढे सोने- चांदीचे दर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे आताही सोने- चांदीच्या दागिनेसह नाणींसह इतर साहित्यातील गुंतवणूक फायद्याची असल्याचा सराफा व्यवसायिकांचा अंदाज आहे.

हेही वाचा – राज्यात थंडीची प्रतिक्षाच! पाऊस मात्र…

हेही वाचा – अर्ज भरण्याची वेळ चुकवणारे अनिस अहमद पुन्हा काँग्रेसमध्ये

चांदीच्या दरातही घसरण

नागपुरातील सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी ३० ऑक्टोंबरला (बुधवारी) चांदीचे दर प्रति किलो १ लाख रुपये नोंदवले गेले. हे दर धनत्रयोदशीच्या दिवशी २९ ऑक्टोंबरला प्रति किलो ९८ हजार ८०० रुपये नोंदवले गेले होते. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (१ नोव्हेंबर) हे दर प्रति किलो ९६ हजार ५०० रुपये होते. दुसऱ्याच दिवशी २ नोव्हेंबरला चांदीचे दर प्रति किलो ९५ हजार रुपये नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात प्रति किलो १ हजार ५०० रुपयांची घट झाली.