बुलढाणा : चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकाविणाऱ्या बुलडाणेकर प्रथमेश जवकार याचे जिल्हा प्रशासनाने कौतुक केले आहे. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दूरध्वनीद्वारे चीन येथे असलेल्या प्रथमेश जवकारचे अभिनंदन केले. १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा चीन मधील हांगझोऊ येथे सुरु आहे. या स्पर्धेत धनुर्विध्या( आर्चरी) स्पर्धेच्या कंपाऊंड राऊंडमध्ये सांघिक प्रकारातील सुवर्ण पदक मिळवित आलमपूर (ता. नांदुरा, जि. बुलढाणा) येथील प्रथमेश समाधान जवकार याने ऐतिहासिक कामगिरी केली.
त्याने देशासह जिल्ह्याचे नाव क्रीडा क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी नोंदविले आहे. यासोबत एक रौप्य, एक कास्य पदकाची कमाई त्याने केली आहे. जागतिक क्रमवारीत त्याने पहिल्या क्रमांकाचे ध्येय बाळगले आहे. त्यादृष्टीने सलग दोनवेळा पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूचा पराभव करीत स्वत:मधील गुणवत्तेची चुणूक दाखविली आहे. जिल्ह्यधिकाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क साधून अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.