वर्धा : सार्वजनिक संस्था या विश्वस्त मंडळीच्या विश्वासावर चालतात. त्यांच्याकडे पाहून लोकं विविध स्वरूपात मदत करतात. पण हेच विश्वस्त घातकी निघाल्यास भक्तांनी काय करावे ? असा प्रश्न चर्चेत आला आहे. येथील श्री संत गजानन महाराज देवस्थान समिती आता याच पेचात आहे.

साई मंदिरास लागूनच असलेल्या या  देवस्थानचे कार्य लोकांच्या विश्वासास पात्र ठरले आहे. म्हणून पैसे, दागिने, भांडे व अन्य स्वरूपात देवस्थानला भक्त मंडळी मदत करतात. याच मदतीवर डल्ला मारला गेला आहे. देवस्थानकडे जमा चांदीच्या किरकोळ दागिन्यांचे काही ठोस करायचे म्हणून हे दागिने विकून त्यात गजानन महाराजांच्या मूर्तीसाठी  चांदीचा टोप करण्याचे ठरले. दागिने एका कारभारी व कथित व्यापारी नेत्याकडे  देण्यात आले. काही काळाने चांदीचा टोप आणण्यास देवस्थानाचे दोघे गेले.

तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण दागिने घेऊन येणाऱ्याने त्यापोटी पैसे घेतले व टोप तयार करण्यास सांगितलेच नाही, असे संबंधित सुवर्णकाराने  स्पष्ट करून टाकले. हे कळताच विश्वस्त स्तब्ध झाले. आता काय करायचे म्हणून त्या कारभाऱ्यास  पैसे परत मागण्याचे ठरले. तेव्हा त्याने जमेल तसे देवू, असा पवित्रा घेतला. आतापर्यंत त्याने ९० हजारापैकी केवळ २० हजार रुपये परत केले. आणखी परत करणे केव्हा शक्य होईल, हे सांगू शकत नसल्याचे त्याने निलाजरेपणाने  सांगितले.

याप्रकरणी पुढे काय, असा प्रश्न विश्वस्त मंडळीस पडला आहे. येत्या २८ तारखेस देवस्थान समितीची बैठक आहे. त्यात हा विषय राहणार असल्याचे एका पदाधिकाऱ्याने नाव नं लिहण्याच्या अटीवर नमूद केले. हा कथित व्यापारी नेता सध्या अन्य एक घोळ केल्याने चर्चेत आहेच. एका सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमासाठी देणगी गोळा करण्यात आली. त्यासाठी या नेत्याने एक विदर्भवादी माजी खासदार व एक माजी आमदार यांच्याकडून अडीच लाख रुपये देणगी म्हणून घेतले. पण ते आयोजकांकडे जमा केलेच नाही.

विचारपूस झाली तेव्हा याने ५० हजार रुपये देत उर्वरित मिळालेच नसल्याचा बनेलपणा केला. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांभोवती मिरविणाऱ्या या कथित नेत्याचे आता काय करायचे, असा संताप व्यक्त होत आहे. देवस्थान दागिने लंपास प्रकरणात पोलीस तक्रार करायची की सामोपचाराने प्रकरण मिटवायचे, हे बैठकीत ठरणार. नेहमी चढ्या आवाजात बोलून समोरच्यास बोलूच नं देणाऱ्या या कथित व्यापारी नेत्याचे विविध प्रताप आता चर्चेत येत आहे.

Story img Loader