नागपूर: अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या दरात सतत घसरण होत असल्याचे चित्र होते. परंतु मागील काही दिवसांपासून पुन्हा सोन्याचे दर विक्रमी उंचीकडे जाताना दिसत आहे. सर्वत्र लग्न समारंभाची रेलचेल सुरू असतानाच सोन्याच्या दरात मोठे फेरबदल होऊन वाढ होत आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमानिमित्त दागिने खरेदीचा बेत असलेल्या कुटुंबात चिंता वाढली आहे.
नागपूरसह सर्वत्र मध्यंतरी सोने- चांदीचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७४ हजार रुपयांपर्यंत विक्रमी उंचीवर पोहोचले होते. त्यानंतर हे दर प्रति दहा ग्राम ७२ हजारांहून खाली आले. परंतु अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बाजार उघडताच सोन्याच्या दराने उसळी घेत संध्याकाळपर्यंत २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७३ हजार ३०० रुपयांपर्यंत मजल मारली. त्यानंतर मात्र सतत काही दिवस दरात घसरण झाली. परंतु मागील काही दिवसांपासून पुन्हा सोने- चांदीचे दर चांगलेच वाढताना दिसत आहे.
नागपूर सराफा बाजारातील दरानुसार मंगळवारी २१ मे रोजी हे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७४ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६९ हजार १००, १८ कॅरेटसाठी ५८ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ४८ हजार ३०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रती किलो ९२ हजार ४०० रुपये होते. दरम्यान अक्षय तृतीयेनंतर चार दिवसांनी १४ मे २०२४ रोजी नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७२ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार ४००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार १०० रुपये होते. चांदीचा दर प्रती किलो ८४ हजार ९०० रुपये होता. दरम्यान नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडून आंतराष्ट्रीय घडामोडीचा सोन्याच्या दरावर परिणाम होत असून हे दर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या दरामध्ये सराफा व्यावसायिक जीएसटी आणि दागिने तयार करण्याचे शुल्क अतिरिक्त घेतले जातात, हे विशेष.
हेही वाचा – ‘श्रीं’ची पालखी १३ जूनला पंढरपूरला होणार रवाना; ३३ दिवसांची पायदळ वारी
चांदीच्याही दरात विक्रमी वाढ
नागपूरसह देशभरात चांदिच्याही दरात खूप वाढ होताना दिसत आहे. नागपूर सराफा बाजारात १६ मे २०२४ रोजी चांदीचे दर प्रति किलो ८५ हजार रुपये होते. हे दर २१ मे २०२४ रोजी ९२ हजार ४०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले. त्यामुळे आठवड्याभरात नागपुरात चांदिच्या दरात तब्बल ७ हजार ४०० रुपये किलोवर वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे चांदिचे दागिने खरेदीचा बेत असलेल्यांना आता जास्त खिसा रिकामा करावा लागत आहे. दरम्यान नागपुरात प्लॅटिनमचे दर ४४ हजार रुपये आहे.