नागपूर: गणेशोत्सवानंतर नागपूरसह राज्यभरात सोन्याचे दर घटले होते. परंतु त्यानंतर हळूहळू दराने नवीन उच्चांक नोंदवला. आताही सोन्याचे दर कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यातच  नवरात्राच्या तोंडावर सोन्याचे दर उच्चांकावर पोहोचले आहेत. त्यामुळे या काळात दागिने खरेदीचा बेत असलेल्या ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.

नवरात्रचा शुभारंभ ३ ऑक्टोबरला आहे. या दिवशी घटस्थापना आहे. परंतु त्यापूर्वी सोन्याचे दर जास्त असल्याने ग्राहक चिंतेत आहेत. नागपुरातील सराफा बाजारात गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याचे दर घसरले होते. परंतु आता पुन्हा सोन्याचे दर वाढत आहेत. १८ सप्टेंबरला नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७३ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ६०० रुपये नोंदवले गेले. त्यानंतर हळूहळू दर वाढत आहेत.

हेही वाचा >>>“उद्धव ठाकरेंनी कोणत्याही मतदारसंघातून जिंकून दाखवावे,” भाजप प्रदेशाध्यक्षांचे आवाहन

दरम्यान, नवरात्रीच्या पूर्वी सोन्याचे दर कमी होत नसल्याने ग्राहकांमध्ये दागिने खरेदीबाबत संभ्रम आहे. नागपुरातील सराफा बाजारात सोमवारी (३० सप्टेंबर) सोन्याचे दर सकाळी ११ वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७० हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे १८ सप्टेंबरच्या तुलनेत नागपुरात ३० सप्टेंबरल सोन्याचे दर जास्तच वाढलेले दिसत आहेत. हा फरक २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम २ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी २ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी दर २ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी दर १ हजार ७०० रुपये वाढ एवढा आहे. दरम्यान, सोन्याचे दर वाढले असले तरी येत्या काढात ते आणखी वाढण्याचे संकेत असल्याने सोन्यात आताची गुंतवणूक लाभदायक असल्याचा अंदाज सराफा व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे.

चांदीच्या दरातही मोठी वाढ

नागपुरातील सराफा बाजारात १८ सप्टेंबरला गणेशोत्सव आटोपल्यावर चांदीचा दर प्रति किलो ८७ हजार ८०० रुपये नोंदवण्यात आला होता. हा दर ३० सप्टेंबरला नवरात्रोत्सवाच्या तोंडावर तब्बल ९१ हजार ५०० रुपये नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे चांदीच्या दरात १८ सप्टेंबरच्या तुलनेत ३० सप्टेंबरला तब्बल ३ हजार ७०० रुपये प्रति किलोची वाढ झालेली दिसत आहे.  प्लॅटिनमचे दर मात्र सातत्याने ४४ हजार रुपरे प्रति दहा ग्राम नोंदवले जात आहेत.