नागपूर : नागपूरसह देशभरात गेल्या काही महिन्यांपासून सतत सोन्याच्या दरात वाढ होत आहे. बघता बघता सोन्याचे दर विक्रमी स्तरापर्यंत वाढले. परंतू गेल्या दोन ते तीन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २० एप्रिलच्या तुलनेत नागपुरात २५ एप्रिलला हे दर सुमारे दोन हजारांनी कमी झाले आहे.
नागपूरसह राज्याच्या बहुतांश भागात लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात होत आहेत. लग्नानिमित्त वर- वधूला सोन्याचे दागिने घेतले जातात. त्यामुळे हल्ली नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडे गर्दी वाढली आहे. दरम्यान सोन्याचे दर मध्यंतरी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७४ हजाराहून जास्तवर गेले होते. त्यामुळे लग्न समारंभ असलेल्या कुटुंबात चिंता वाढली होती. परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांत हे दर खाली आले आहे.
दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात २५ एप्रिलला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रामसाठी ७२ हजार २००, २२ कॅरेटसाठी ६७ हजार १००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ९०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ८० हजार ७०० रुपये होते.
हेही वाचा…यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात चुरस; मागासवर्गीय, मुस्लीम व आदिवासी मते ठरणार गेम चेंजर!
हे दर २० एप्रिल २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति दहा ग्राम ७४ हजार १००, २२ कॅरेटसाठी ६८ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४८ हजार २०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ८४ हजार १०० रुपये होते. त्यामुळे नागपुरात २० एप्रिल २०२४ या दिवसाच्या तुलनेत २५ एप्रिल २०२४ यादिवशी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम १ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी १ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी १ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी १ हजार ५०० रुपयांनी घसरले. तर चांदीच्या दरात किलोमागे तब्बल ३ हजार ३०० रुपयांची घसरण झाली.