नागपूर : सोने- चांदीचे दर सातत्याने वाढत असून बघता- बघता हे दर उच्चांकीवर पोहचले आहे. नागपूरसह देशभरात सातत्याने सोन्याचे दर वाढत असतांनाच मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. त्यामुळे मागील तेरा दिवसांतील हे दर निच्चांकीवर आल्याचे चित्र आहे. दर घसरल्याने सोने- चांदीचे दागिने खरेदीचा बेत असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

करोनानंतर सातत्याने सोन्याच्या दरात वाढ होत आहे. नागपुरातील सराफा बाजारात २० मार्च २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ८९ हजार २०० रुपये नोंदवण्यात आले होते. हे दर आजपर्यंतचे विक्रमी दर आहे. त्यानंतर दरात किंचित घट झाली. परंतु सातत्याने १४ मार्च २०२५ पासून नागपुरात सोन्याचे दर ८८ हजाराहून वरच नोंदवले गेले. सोमवारी (२४ मार्च २०२५) रोजी सोन्याच्या दरात किंचित घट झाली होती. सलग दुसऱ्याही दिवशी सोन्याच्या दरात पून्हा घट झाली. त्यामुळे तेरा दिवसानंतर सोन्याचे दर नागपुरात प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ८८ हजाराहून खाली आले आहे. हे दर नागपुरात १३ मार्च २०२५ रोजी ८७ हजार १०० रुपये होते. परंतु १४ मार्चपासून हे दर सातत्याने ८८ हजाराहून वर आहे.

नागपुरातील सराफा बाजारात सोमवारी (२४ मार्च २०२५ रोजी) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८८ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८२ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ६८ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५७ हजार ३०० रुपये नोंदवले गेले होते. हे दर मंगळवारी (२५ मार्च २०२५)२४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८७ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८१ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६८ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५७ हजार १०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरातील सराफा बाजारात २४ मार्च २०२५ रोजीच्या तुलनेत २५ मार्च २०२५ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी २०० रुपये, १४ कॅरेटसाठी २०० रुपये घसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे लग्नसमारंभ, वाढदिवसासह इतर कार्यक्रमात दागिने खरेदीचा बेत असलेल्या ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे.

चांदीच्या दरात…

नागपुरातील सराफा बाजारात २४ मार्च २०२५ रोजी चांदीचे दर प्रति किलो ९८ हजार ५०० रुपये होते. हे दर आज मंगळवारी (२४ मार्च २०२५ रोजी) प्रति किलो ९८ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात मात्र कोणतेही बदल झाले नसल्याचे दिसत आहे.