नागपूर : नागपूरसह देशभरात सोन्याचे दर नियंत्रण येत नाही. नववर्षात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून प्रत्येक दोन- तीन दिवसांत नवीन उच्चांकीवर दर आलेले दिसतात. सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या दराने दागिने खरेदीसाठी इच्छुक ग्राहकांमध्ये चिंता वाढली असतांनाच दरवाढीने विक्रीवर परिणामाचा धोका असल्याने सराफा व्यवसायिकांना चिंता लागली आहे. सोन्याच्या आजच्या दराबाबत जाणून घेऊ या.
नागपूरसह राज्याच्या विविध भागात हल्ली लग्न, वाढदिवसासह इतरही कार्यक्रमांचे आयोजन वाढले आहे. या कार्यक्रमात आजही अनेक नागरिक सोने- चांदीचे दागिने वा इतरही वस्तू भेट देतात. त्यामुळे आता नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडे ग्राहकांची कमी- अधिक गर्दी आहे. परंतु सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांकडून पूर्वीच्या तुलनेत विक्रीत आताच्या हंगामात घटही नोंदवल्या जात असल्याचे काही व्यवसायिक सांगत आहेत.
दरम्यान, नववर्षात सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंता होती. नागपुरातील सराफा बाजारात १ फेब्रुवारी २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ८२ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६४ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५३ हजार ८०० रुपये नोंदवले गेले होते. हे दर १ फेब्रुवारी २०२५ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८४ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७९ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ६६ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५५ हजार २०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरातील सराफा बाजारात १ फेब्रुवारी २०२५ या दिवशीच्या तुलनेत ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सहा दिवसांत सोन्याचे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम २ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी २ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी १ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी १ हजार ४०० रुपये वाढलेले दिसत आहे. दरम्यान हे दर वाढले असले तरी येत्या काळात आणखी दरवाढीचा अंदाज असल्याने आता सोन्यामध्ये गुंतवणूक लाभदायक असल्याचा सराफा व्यवसायिकांचा दावा आहे.
चांदीच्या दरातही मोठे बदल…
नागपुरातील सराफा बाजारात १ फेब्रुवारी २०२५ रोजी ९४ हजार १०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले. तर ६ फेब्रुवारी २०२५ रोजी हे दर ९६ हजार रुपये प्रति किलो होते. त्यामुळे १ फेब्रुवारीच्या तुलनेत ६ फेब्रुवारीला चांदीच्या दरात १ हजार ९०० रुपयांनी वाढ झाली आहे.