अकोला : ‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झाला आहे. ते तुम्हालाही मारू शकतात, तुमच्या सोन्याच्या अंगठ्या आमच्याजवळ द्या’ असे सांगत वृद्धाला लुटल्याची घटना अकोट-अंजनगाव मार्गावर पणज गावाजवळ घडली. या प्रकरणात अकोट ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अचलपुरातील अब्बासपुरा येथे रहिवासी नथ्थुजी संपतराव केचे (वय ७२) यांच्या तक्रारीनुसार, १० जुलै रोजी अकोल्यात त्यांच्या नातेवाईकांकडील लग्न होते. त्यासाठी अचलपूरवरून ते दुचाकीने आले. लग्न समारंभ आटोपून ११ जुलै रोजी सकाळी अकोटला गेले. त्याठिकाणी मुक्काम करून १२ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास ते दुचाकीने अचलपूरकडे जाण्यास निघाले.
दरम्यान, मागच्या बाजूने दुचाकीवर रेनकोट घातलेले दोन जण आले. त्यांनी अडवून पोलीस असल्याचे सांगितले आणि अकोट येथे खून झाला. आरोपींनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. तुमच्याकडील अंगठ्या घड्याळ काढून द्या आणि खिशात ठेवा, असे सांगितले. त्यातील एकाने दोन अंगठ्या, घड्याळ घेत, रूमालात बांधून दिले आणि खिशात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर नथ्थुजी केचे यांनी काही अंतरावर गेल्यानंतर खिशातील रूमाल उघडून पाहिला असता, घड्याळाशिवाय त्यात काहीच नव्हते. पोलीस असल्याची बतावणी करून दोघांनी लुटल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.