लोकसत्ता टीम

नागपूर: दिवाळीच्या तोंडावर सोने- चांदीच्या दरातील वाढ थांबण्याचे नाव घेत नाही. नवरात्रीनंतर बघता बघता नागपुरातील सराफा बाजारात चांदीच्या दराने प्रति किलो एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. तर सोन्याचे दरही विक्रमी उंचीवर गेल्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.

सोन्याची सततची दरवाढ बघता दिवाळीत सोन्याचे दर ८५ हजार रुपयांचा टप्पा ओलांडणार काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दिवाळीत ग्राहक मोठ्या संख्येने सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात. तर लग्न समारंभ, बारसे आणि इतरही अनेक कार्यक्रमात ग्राहक भेट म्हणून सोने- चांदीचेही दागिने देतात.

दरम्यान हल्ली सोन्याच्या दर उंचीवर गेल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. नागपुरातील सराफा बाजारात २२ ऑक्टोंबरला बाजार उघडल्यावर सोन्याच्या दरात एक दिवसापूर्वीच्या तुलनेत किंचित घट झाली. त्यामुळे २२ ऑक्टोंबरला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७८ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार रुपये नोंदवले गेले.

आणखी वाचा-‘अहेरी’तून धर्मरावबाबा आत्राम यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी, भाजपाचा दावा निष्फळ

दरम्यान बुधवारी (२३ ऑक्टोंबर) बाजार उघडल्यावर सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली. २३ ऑक्टोंबरला नागपरात सोन्याचे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ७८ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. तर प्लॅटिनमचेही दरही २१ ऑक्टोबरला रात्री ४४ हजार रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले.

दरम्यान हे नागपुरातील आजपर्यंतचे सोन्याचे सर्वोच्च दर आहे. दरम्यान सोन्याच्या दरात सातत्याने होणारी वाढ बघता ग्राहकांमद्ये चिंता वाढली आहे. या दरवाढीचा दिवाळीतील दागिने खरेदीवरही परिणामाचे संकेत काही सराफा व्यवसायिकांकडून बोलून दाखवले जात आहे.

आणखी वाचा-बल्लारपुर काँग्रेसकडे तर चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे

चांदीचे दर विक्रमी उंचीवर

दिवाळीच्या तोंडावर नागपुरातील सराफा बाजारात २१ ऑक्टोबरला (सोमवारी) रात्री बाजार बंद होतांना चांदीचे दर प्रति किलो ९८ हजार ५०० रुपये नोंदवण्यात आले होते. परंतु हे दर दुसऱ्या दिवशी सराफा बाजार उघडल्यावर सकाळी ११ वाजता ९८ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. तर नागपुरात बुधवारी (२३ ऑक्टोंबर) चांदीचे दर चक्क १ लाख रुपये प्रति किलोवर पोहचले. हे नागपुरातील आजपर्यंतचे सर्वाधिक दर आहे. या दरवाढीमुळे दिवाळीत मोठ्या प्रमाणावर विक्री होणाऱ्या चांदीच्या विविध देवी- देवतांच्या नाणी विक्रीवर परिणामाची शक्यता आहे.