नागपूर : जो तो उठतो आणि राष्ट्रीय नेता बनतो. समाजातील प्रत्येक नेत्याला अखिल भारतीय नेता बनायचे असते. त्यामुळे आपले पक्ष, संघटना एकसंघ राहत नाहीत. आंबेडकरी समाजाला फुटीचा शाप आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री व भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.
दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भुपेश थुल, अर्जुन डांगळे, ॲड. विजय आगलावे, दिलीप जगताप, गौतम सोनवणे, दिवाकर सेजवळ उपस्थित होते. ते म्हणाले, दलित पँथरची स्थापना १९७२ रोजी झाली. पँथरमुळे रिपब्लिकन पक्षाला, आंबेडकरी चळवीला बळ मिळाले. परंतु राजा ढाले आणि नादेवराव ढसाळ यांच्यात वाद झाला आणि पँथर १९७४ ला फुटली. दलित पँथरची फुट दलित चळवळीसाठी धक्का होता. भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना नागपुरात ३ ऑक्टोबर १९५७ साली झाली. वास्तविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्राच्या आधारे पक्ष स्थापन होणे अपेक्षित होते. सर्व जातीधर्माचा हा पक्ष असावा आणि तो सत्ताधारी झाला पाहिजे, अशी इच्छा बाबासाहेबांची होती. पण समाजाला फुटीचा शाप आहे. पक्षाची घटना काय असावी यावरून वाद निर्माण झाला आणि एका वर्षात पक्षात फुट पडली. आता आरपीआयमधील सर्व गट एकत्र यावे, अशी समाजाच्या लोकांची भूमिका आहे. त्यावर आणि दलित पँथर ही चळवळ पुन्हा उभी राहू शकते काय, यावर विचार झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – चंद्रपूर रेंजजवळील जंगलात वाघिणीचा मृतदेह आढळला; मृत्यूमागील कारण काय?
“प्रकाश आंबेडकरांना ओळखतो”
ॲड. प्रकाश आंबेडकर आणि मी एकमेकांवर टीका-टिप्पणी करीत नाहीत. त्यांना प्रसिद्धी माध्यमांनी माझ्याबद्दल प्रश्न विचाल्यास ते आठवले यांना ओळखत नाही, असे उत्तर देतात. मी मात्र प्रकाश आंबेडकरांना ओळखतो, अशी प्रतिक्रिया देतो. परंतु आम्ही एकमेकांविरुद्ध उलटसुलट बोलत नाहीत, असेही रामदास आठवले म्हणाले.