गोंदिया : स्थानिक पालकमंत्र्यांच्याबाबतीत गोंदिया जिल्हा नेहमीच दुर्दैवी ठरला आहे. जिल्हा निर्मितीनंतर महादेवराव शिवणकर, राजकुमार बडोले आणि परिणय फुके वगळता नेहमी इतर जिल्ह्यातील नेतेच पालकमंत्री म्हणून लाभले. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आत्तापर्यंत चार वर्षांच्या काळात गोंदिया जिल्ह्याला पाच पालकमंत्री मिळाले. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला पुन्हा एकदा नवीन पालकमंत्री मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास चार वर्षांत सहा पालकमंत्री मिळण्याचा विक्रम गोंदिया जिल्ह्याच्या नावे नोंदवला जाईल.
गोंदिया जिल्हा राज्याच्या पूर्व टोकावर आहे. निसर्गसंपन्न आणि जंगलव्याप्त असल्यामुळे या जिल्ह्याला विशेष स्थान आहे. मात्र नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहूल असल्यामुळे या जिल्ह्याकडे राज्य शासनाचे कायमच दुर्लक्ष झाले. प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे वजनदार नेते असूनही त्याचा फारसा लाभ जिल्ह्याला झाला नाही. महादेवराव शिवणकर राज्याचे मंत्री असताना भंडारा जिल्ह्याची विभागणी झाली. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवणकर यांनी प्रभावशाली भूमिका बजावली होती. त्यानंतरच्या काळात मात्र जिल्ह्यावर कायमच बाहेरचे पालकमंत्री लादण्यात आले. या पूर्वीचे पालकमंत्री तर वर्षातून फक्त झेंडावंदन करण्याकरिताच येत होते. त्यामुळे त्यांना ‘झेंडामंत्री’ अशी बिरुदावलीदेखील लाभली.
हेही वाचा – ‘तरुण पोरगा कुंवारा अन् बापाचे लग्न दुबारा’, निवृत्त शिक्षक नियुक्तीचे संतप्त पडसाद
हेही वाचा – वैदर्भियांनो सावधान! आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता
राजकुमार बडोले आणि परिणय फुके पालकमंत्री असताना त्यांनी ती पोकळी भरून काढली. २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची सत्ता आली. अनिल देशमुख यांच्याकडे पुन्हा एकदा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा आली. त्यांच्यावर आरोप झाल्याने मंत्रीपदाचा राजिनामा दिल्यानंतर नवाब मलीक यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले. मात्र तेदेखील मंत्रीपदावरून पायउतार झाल्याने संजय बनसोडे व त्यानंतर मविआ सरकार असेपर्यंत प्राजक्त तनपुरे पालकमंत्री होते. काहीच महिने लोटले असताना राज्यात सत्ताबदल झाला. त्यात सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पालकमंत्रीपद आले. आता सरकारची वर्षपूर्ती झाली असताना पुन्हा सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाला. त्यामुळे लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास चार वर्षांत सहा पालकमंत्री, असा विक्रम गोंदिया जिल्ह्याच्या नावे नोंदवला जाईल.